सातारा : येथील सिव्हिल कॉलनी परिसरात झालेल्या घरफोडीत ४.४० लाखांचा सोन्याचा ऐवज चोरीस गेला आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी दोघांना अटक केली असून, यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आकाश राजेंद्र यादव (२६, गोडोली, सातारा) यांची संभाजीनगर येथील ढाणे क्लासेसशेजारी असणाऱ्या सिव्हिल कॉलनीत ‘फ्रेंड बेकरी’ आहे. त्यांनी त्यांच्या बेकरीच्या काउंटरच्या ड्राव्हरमध्ये ४.४० लाखांचे सोन्याचे दागिने ठेवले होते. यामध्ये प्रत्येकी दोन तोळ्यांची पाच वेढणी, प्रत्येकी अर्धा तोळ्याची दोन वेढणी असे अकरा तोळे सोने चॉकलेटी रंगाच्या प्लास्टिकच्या पिशवीत बांधून एका डब्यात ठेवले होते. मात्र, अज्ञात चोरट्याने बनावट चावीचा वापर करून ड्राव्हर खोलून ते लंपास केले. ही घटना १५ जानेवारी रात्री आठ ते दि. १८ जानेवारी रोजी सकाळी अकरा या वेळेत घडली आहे. आकाश यादव यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी मंगळवारी दुपारी सातारा शहर पोलीस ठाण्यात याची तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करून घेतल्यानंतर प्राथमिक माहितीच्या आधारे महेश शंकर तडाखे (वय १८, रा. २३६, साईबाबा मंदिराजवळ, गोडोली, सातारा) आणि जयश्री शंकर यादव (४२, रा. अहिरे कॉलनी, देगाव रोड, संभाजीनगर, सातारा) यांना अटक केली. दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेला महेश तडाखे हा बेकरी मालक आकाश यादव यांचा मित्र असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. अधिक तपास सातारा शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम करत आहेत.