पळशी : मार्डी-म्हसवड मार्गावरील असलेल्या वनविभागाच्या वनीकरणास लागलेल्या आगीने वनसंपदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ग्रामस्थांच्या मदतीने सुमारे तीन तासांनंतर आग आटोक्यात आणण्यात वनविभागाला यश आले.मार्डी म्हसवड मार्गालगत वनविभागाने तीन वर्षांपूर्वी २५ हेक्टर क्षेत्रात लिंब, चिंच, वड व पिंपळ झाडांची लागवड केली होती. या वनीकरणास गुरुवारी दुपारी आग लागल्याचे येथील ग्रामस्थांनी पाहिले. अचानक लागलेल्या आगीने वनसंपदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते.
गांभीर्य ओळखून माळीखोरा येथील ॲड. मोहन देवकुळे, दादासाहेब खाडे, सचिन देवकुळे, विजय जळक, लाला जळक, बनाजी चव्हाण, पिंटू पोळ, सुजित सावंत, नाना जळक या युवकांनी झाडाच्या फांद्यांच्या मदतीने व येथील जवळच असलेल्या हातपंपावरील पाण्याने तसेच टँकरच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांच्या सतर्कतेने आग विझवण्यात यश आले असले तरी जवळपास निम्मे क्षेत्र आगीने जळाले आहे.ग्रामस्थांनी संपर्क केल्यानंतर चारच्या सुमारास वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत आग विझवण्याचा प्रयत्न ग्रामस्थ करत होते. परंतु निम्मे क्षेत्र आगीने जळाले होते. या आगीने अनेक झाडांची पाने जळाली आहेत.
मार्डी म्हसवड रस्त्याच्या बाजूने लागली असून कोणीतरी वाईट हेतूने हे कृत्य केले आहे. तपास करून संबंधितांवर कारवाई केली जाईल.- मारुती मुळे,वनक्षेत्रपाल दहिवडी