पळशी : माण तालुक्यातील पळशी, मार्डीसह परिसरात गेल्या आठ दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असून, शेतात पाणी साठून राहिल्याने लागण केलेल्या कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. पाणी सरीत साठल्यामुळे कांद्याच्या मुळ्या कुजत असून, कांदा पीक पिवळे पडून कांदा जळू लागला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेतातील कांदा पिकात पाळ्या घातल्या असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
परिसरात आठ ते दहा दिवसांपासून रिमझिम पाऊस होत असून, उघडीप होत नसल्याने लागणीचा कांदा जळून जात आहे. बदलत्या हवामानामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. कांदा लागण व बियाणांचा खर्च एकरी जवळपास तीस ते चाळीस हजार येत असून, सर्व खर्च कांदा जळून गेल्याने वाया गेला आहे.
या परिसरात कांदा पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. याच पिकातून शेतीचा भांडवली खर्च निघत असल्याने परिसरात अनेक शेतकऱ्यांनी कांदा पीक घेतले आहे; पण रिमझिम पावसाने कांदा पीक जळून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जास्त पाण्यामुळे कांदा पिकाच्या माना लांबल्या असून, औषधाच्या खर्चाने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. गेल्या वर्षीही मोठा पाऊस झाल्याने शेतातच कांदा पिकाच्या मुळ्या कुजून गेल्या. त्यामुळे मागील वर्षीही नुकसान झाले होते. यावर्षीही दमदार पाऊस नसला तरी रिमझिम पाऊस होत असून, उघडीप नसल्याने कांदा जळू लागला आहे. त्यामुळे यावर्षी कांदा उत्पादनात कमालीची घट होणार आहे. काही शेतकऱ्यांनी धूळ वाफ्यावर कांदा पीक घेतले होते. धूळ वाफ्यावरील कांद्याची मूळकुज होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची धूळ वाफ्यावर दुबार पेरणी केली असली तरी रिमझिम पावसामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
चौकट..
शासनाने पंचनामे करावेत...
सध्या लॉकडाऊनमुळे कांदा पिकाला दर नसल्याने बळीराजा अगोदरच अडचणीत आहे. गेल्या हंगामातील उन्हाळी कांदा दर नसल्याने ऐरणीत बंद आहे. दर वाढण्याची शेतकरी प्रतीक्षा करीत आहेत, तर या हंगामातील कांदा रिमझिम पावसाने शेतातच खराब झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. प्रशासनाने कांदा पिकाची पाहणी करून पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे.
कोट..
रिमझिम पावसामुळे मूळकूज होऊन कांदा जळत आहे. सहा एकर कांदा पिकात पाळी घातली असून, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पंचनामे होऊन नुकसानभरपाई मिळावी.
-बाबासाहेब जळक, शेतकरी, पळशी
१८पळशी
पळशी (ता. माण) येथे रिमझिम पावसामुळे शेतात पाणी साठल्यामुळे लागण केलेल्या कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे.