स्वप्नील शिंदे ।सातारा : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले. झालेल्या पीकहानीचे पंचनामे करण्यासाठी प्रशासन मिशन मोडवर काम करीत आहे. त्यासाठी अधिकारी व कर्मचारी शेतकºयाच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करून त्याचा अहवाल तयार करीत आहेत. आतापर्यंत ५० टक्क्यांपेक्षा जास्त काम झाले आहे.
अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. सोयाबीनला शेंगा फुटल्याने दाण्याने अंकुर फुटले आहेत. अनेक ठिकाणी भात भिजल्याने काळे पडले असून, उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. तसेच द्राक्ष व डाळिंब बागांनाही तडाखा बसला आहे. द्राक्षांचे घड फुटले असून, डाळिंबाची फूलगळती झाली आहे. शेतात पाणी साचून राहिल्याने आले व हळद पिकात कंदकुज वाढू लागली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम महसूल, कृषी विभागाच्यावतीने युद्धपातळीवर सुरू आहे. यावेळी अधिकारी व कर्मचारी शेत शिवारात साचलेल्या पाण्याचे डबके व चिखलातून वाट काढत बांधावर जाऊन शेतीची पाहणी करीत आहेत. त्यांनी शेतकºयांशी संवाद साधला असता नुकसानीची तातडीने भरपाई मिळावी, अशी विनवणी करीत आहेत.
सातारा, जावळी, पाटण तालुक्यातील हात तोंडाशी आलेला भात पाण्यात गेला आहे. ज्या दिवशी भाताची कापणी त्याच दिवशी पडलेल्या पावसामुळे शेतात भिजत पडला आहे. सोयाबीनच्या शेंगा फुटून त्यांना अंकुर आल्याने आहेत. तर काही ठिकाणी सोयाबीन काळे पडले असून, बाजारात त्याची खरेदी केली जात नाही. खंडाळा, फलटण, माणमधील शेतात पाणी साचून राहिल्याने उसाच्या कांडीला कोंब फुटले आहेत. वाई, कोरेगाव परिसरातील फुले व भाजीपाला कुजून गेला आहे. मात्र, त्याची सातबारावर नोंद नसल्याने त्यांचा पंचनामा करून भरपाई मिळणे अवघड झाले आहे. त्याच्यासाठी हजारो रुपये खर्च करण्यात आला आहे. ऐन रब्बीच्या हंगामात पीक वाया गेल्याने पुढील खर्च कसा उभा करायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. हातात पैसे नसल्याने रब्बीची पेरणी कशी करायची, असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे.आॅक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या खरीप हंगामातील सोयाबीन पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्या खालोखाल भात, भुईमूग, ज्वारी, घेवडा आदी पिके मातीमोल झाली आहेत. तर माण, फलटण, खटाव आणि कोरेगावमधील बाजरी, घेवडा आदी पिके पाण्यात गेली.पूर्व भागातील खंडाळा, फलटण, माण व खटाव तालुक्यातील द्राक्ष आणि डाळिंब बागांनाही अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. पोटच्या पोरासारख्या सांभाळलेल्या बागांमध्ये चार-चार दिवस पाणी साचून राहिल्याने त्यांनी माना टाकल्या आहेत. अधिकारी जेव्हा पंचनामा करताना फोटो काढण्यासाठी शेतात उभे राहण्यास सांगतात, तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले.असा केला जातोय पंचनामामहसूल व कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी नुकसान झालेल्या शेतात जातात. त्या ठिकाणी ज्या शेतकºयांनी पिकविमा काढला आहे, त्या शेतकºयांचा नुकसान झालेल्या पिकासह फोटो काढला जात आहे. तसेच पंचनाम्यांचा फॉर्म भरून घेतला जात आहे. शेतकºयांना कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी ६ हजार ३०० रुपये, बागायती पिकांसाठी हेक्टरी १३ हजार ५०० रुपये, फळ व बहुवार्षिक पिकांसाठी १७ हजार रुपये नुकसान भरपाई दिली जाणार आहे.वाई तालुक्यातील वेळे व गुळुंब येथे गाव कामगार तलाठी, कृषी सहायक, कोतवाल, ग्रामसेवक यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीचा पंचनामा केला.