म्हसवड : माण तालुक्यातील पळसावडे, देवापूर, शिरताव, वरकुटे-मलवडी परिसराला काल, रविवारी रात्री दहाच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह वादळ व गारपिटीसह मुसळधार वळीव पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे तालुक्यातील दोघा शेतकऱ्यांचे द्राक्ष आणि आंब्याच्या बागेचे मोठे नुकसान झाले आहे.या वादळात पळसावडे येथील द्राक्ष बागायतदार कुंडलिक यादव यांची पावणे दोन एकर द्राक्ष बाग भुईसपाट झाली तर देवापूर येथील आंबा बागायतदार कृष्णराव रघुनाथ बाबर यांची एक एकर आंब्याची बाग भुईसपाट झाली आहे. कृष्णराव बाबर यांच्या आंब्याच्या बागेला दोनच दिवसांपूर्वी व्यापारी भेट देऊन गेले होते. १४० रुपये दराने संपूर्ण बाग ठरविण्यात आली होती. आठ ते दहा दिवसांत बाग उतरायची होती. अंदाजे १२ ते १३ टन माल अपेक्षित होता.
मात्र वळवामुळे बाबर यांचे १४ ते १५ लाखांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, या पावसाने परिसरातील आंबा, द्राक्ष, नारळ बागांसह दोडका, कारले, टोमॅटो या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.आंबा, द्राक्ष, नारळाचे नुकसान झाल्याची कृषी विभागाने पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. अजून दोन दिवस वळीव पावसाचे संकट असण्याची शक्यता आहे. यामुळे आंबा, द्राक्ष बागायतदारांची चिंता वाढली आहे. पुढील दोन चार दिवसांत पाऊस वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
कर्जमाफीच्या आनंदावर पाणी..सध्या राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर झाल्यामुळे आनंदाचे वातावरण आहे. अशातच रविवारी देवापूर, पळसावडे भागात वादळी वाऱ्यासह वळवाच्या पावसामुळे शेती पिकांचे, फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या या आनंदावर पावसाने पाणी फिरवल्याची भावना व्यक्त केली जात आहे. हातातोंडाशी आलेली फळपिके हिरावली गेलीच आहेत. शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.