कोपर्डे हवेली : कोपर्डे हवेली परिसरात भात पेरणीच्या तुलनेत भाताची रोपांची लावण केली जाते. त्यासाठी रोहिणी नक्षत्राच्या दरम्यान रोपे तयार करण्यासाठी भाताचे बियाणे वाफे करून टाकले होते; पण गेल्या आठवड्यापासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे उगवण झालेले तरवाची मुळे कुजल्याने नुकसान झाले असून, रोपांची टंचाई निर्माण होणार असल्याचे चित्र सध्या कोपर्डे हवेली परिसरातील शिवारात दिसत आहे.कोपर्डे हवेली परिसर हा बागायती म्हणून ओळखला जातो. ऊसापाठोपाठ भाताचे क्षेत्र जादा असते. शेतकरी बाजारपेठत इंद्रायणी तांदळाला चांगली मागणी असल्याने जादा उत्पादन खर्च करून जादा उत्पादन घेतात. भाताच्या तरवे स्वत: तयार करून त्याची लावण करतात त्यासाठी भाताचे तरवे रोहिणी नक्षत्राच्या दरम्यान टाकतात. यंदाही भाताची रोपे लावणीसाठी अनेक शेतकऱ्यांनी तरवे टाकले होते. त्यासाठी वाफे तयार करून सेंद्रिय खत टाकून भाताची टोकण केली होती.तरवे जोमदार आले होते. गेल्या आठ दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे रोपांना मुळे कुजवा झाल्याने काही शेतकऱ्यांचे तरवे वाया गेले आहे. काही शेतकऱ्यांचे तरवे चांगले असले तरी तुलनेत परिसरात भात लावणीचे क्षेत्र जादा असल्याने भात रोपांची टंचाई जाणवणार असल्याचे शेतकरी बोलत आहेत.
इंद्रायणी सुवासिक नवीन वाणाचे बियाणे भात रोपे तयार करण्यासाठी टाकले होते. सततच्या पावसामुळे रोपांना मुळे कुजवा झाला असल्याने यातील थोड्याच रोपांची लावण करता येणार आहे. रोपांच्या टंचाईमुळे रोपांची किंमत वाढणार आहे. -विक्रम चव्हाण, शेतकरी, कोपर्डे हवेली