खंडाळा : नीरा खोऱ्यामध्ये येणाऱ्या सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील वीर, भाटघर धरणांसह नीरा-देवघर, गुंजवणी या धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली असून, ही चारही धरणे १०० टक्के भरली आहेत. या चारही धरणांतून पाण्याचा विसर्ग नदीपात्रामध्ये सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती वीर धरण प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
वीर, भाटघर, नीरा-देवघर, गुंजवणी या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून चांगला पाऊस पडत असल्याने या चारही धरणांमध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. त्यामुळे ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत.
नीरा-देवघर, भाटघर व गुंजवणी या तीन धरणांतून विसर्ग सुरू असल्याने वीर धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक वाढली असून, धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. सोमवारी दुपारनंतर वीर धरणातून २३,१८५ क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीमध्ये सुरू करण्यात आला आहे. तसेच भाटघर धरणातून ८६२४ क्युसेक, नीरा-देवघर धरणातून ५११० क्युसेक, गुंजवणी धरणातून ९९८ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नीरा खोऱ्यातील चारही धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना धरण प्रशासनाच्यावतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
१३खंडाळा धरण
फोटो मेल केला आहे