दत्ता यादव / सातारा कर्ज काढून थाटलेले व्यवसाय गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमध्ये क्षणात होत्याचे नव्हते झाले. यंदाही हीच परिस्थिती ओढावतेय की काय, या धास्तीने गोडोली तळ्याशेजारी असणाऱ्या व्यावसायिक व नागरिकांच्या काळाजाचा ठोका चुकत आहे. संततधार पाऊस सुरू झाली की व्यावसायिक खडबडून जागे होत आहेत. दुकानात पाणी तर शिरले नसेल ना, हे पाहण्यासाठी काहीजण रात्री-अपरात्री झोपेतून उठून दुकानाकडे फेरफटका मारत आहेत. प्रशासनाने पाठ फिरविल्यामुळे येथील लोकांनी वर्गणी काढून एक ओढा स्वच्छ केला; परंतु दुसरा ओढा कधी काळ बनून रौद्ररूप धारण करेल, याची शाश्वती नसल्यामुळे येथील व्यावसायिक अक्षरश: हतबल झाले आहेत. काही वर्षांपूर्वी गोडोली तळ्याचे सुशोभीकरण करताना तळ्याभोवती संरक्षण भिंत उभारण्यात आली. या ठिकाणी असलेल्या भैरवनाथाचा आणि काळंबीच्या नैसर्गिक ओढ्यावर छोट्या नळ्या टाकून त्यातून पाणी दुसरीकडे वळविण्यात आले. जेणेकरून तळ्यात पाणी जाणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली; परंतु नैसर्गिक ओढ्याच्या प्रवाहाचे पात्र बदलल्यामुळे गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमध्ये ओढे-नाले तुडुंब वाहू लागले. पाईपमध्ये गाळ आणि प्लास्टिक अडकल्यामुळे येथील व्यावसायिकांच्या दुकानामध्ये पाणी शिरले. त्यामुळे लाखोंचे नुकसान झाले. काही बेरोजगार युवकांनी कर्ज काढून छोटे-मोठे व्यवसाय थाटले होते. अशा युवकांना पुन्हा बेरोजगार होण्याची वेळ आली. मात्र, संकटावर मात करत येथील सर्वच गाळेधारकांनी पुन्हा उभारी घेऊन आपले व्यवसाय नव्याने थाटले. गोडोली परिसर हा त्रिशंकू विभागात येत असल्यामुळे या ठिकाणी नेमका विकास कोणी करायचा, असा प्रश्न नेहमीच प्रशासनाला पडत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे गोडोली तळ्याच्या शेजारून जे दोन ओढे वाहत आहेत. त्या ओढ्यांची स्वच्छता करण्यासाठी येथील ४४ गाळाधारकांनी पुढाकार घेतला. मे महिन्यामध्ये प्रत्येकाकडून दोन हजार रुपये वर्गणी काढून उजव्या बाजूचा काळंबीचा ओढा पूर्णपणे स्वच्छ करण्यात आला. तब्बल ७० ट्रॉली गाळ या ओढ्यातून काढण्यात आला. मात्र, पैसे अपुरे पडल्यामुळे दुसरा भैरवनाथाचा ओढा स्वच्छ करायचा राहून गेला. त्यामुळे आता गेल्या वर्षासारखी स्थिती ओढावतेय की काय, या काळजीने सर्व व्यावसायिकांची अक्षरश: घालमेल सुरू झाली आहे. गोडोली तळ्यामध्ये पूर्वीसारखेच पाणी सोडले तर गेल्या वर्षासारखी परिस्थिती व्हायची नाही, असे येथील व्यावसायिकांचे म्हणणे आहे. आदेश प्रत्यक्षात उतरेल का? किल्ले अजिंक्यताऱ्याच्या उतारावरून येणारे पाणी रस्त्यावर येऊ नये म्हणून गोडोली तळ्यात पूर्वीप्रमाणे सोडावे, असा आदेश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी प्रांताधिकारी व तहसीलदारांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर गोडोली येथील स्थानिकांची मते जाणून घेतली असता, हा आदेश प्रत्यक्षात उतरेल का, अशी अनेकांना शंका आहे. रस्ता खोदून ओढ्यामध्ये पाईप टाकण्यात आल्या आहेत. हे काम पावसाळ्यापूर्वी होणे अपेक्षित होते. आता तहान लागली म्हणून विहीर खोदण्यासारखा प्रकार आहे. सध्या पाऊस सुरू असल्याने गेल्या वर्षासारखी परिस्थिती ओढावू शकते. त्यामुळे सध्या हे काम कधी पूर्ण होणार की जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश नुसता कागदावरच राहणार, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने नागरिकांमधून उपस्थित केले जात आहेत.
पुराचा धोका... चुके काळजाचा ठोका!
By admin | Published: June 25, 2015 12:58 AM