सातारा : मेढा - महाबळेश्वर मार्गावर असलेला केळघर घाटरस्ता रुंदीकरण व काँक्रिटीकरणामुळे वाहतुकीसाठी प्रशस्त झाला आहे. मात्र, या घाटात दरड कोसळण्याचा धोका अजूनही टळलेला नाही. डोंगर उतारावरून मातीचा भराव हळूहळू रस्त्याच्या दिशेने सरकू लागला असून, बांधकाम विभागाने पावसाळा सुरू होण्यापूर्वी योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे.महाबळेश्वरला जोडणारा जवळचा रस्ता असल्याने केळघर घाटातून वाहनधारकांची सातत्याने रेलचेल सुरू असते. अलीकडे या रस्त्याचे रुंदीकरण व क्राँक्रिटीकरण करण्यात आल्याने वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. या घाटरस्त्याचे रुंदीकरण करत असताना डोंगराकडील मातीचा भराव हटवून वाहतूक सुरक्षित करण्यात आली. परंतु, पुन्हा एकदा डोंगरावरील माती हळूहळू रस्त्याच्या दिशेने सरकू लागली आहे. एखादा मोठा पाऊस झाल्यास मातीचा हा भराव व दरड रस्त्यावर कोसळून घाटरस्ता बंद होऊ शकतो. त्यामुळे बांधकाम विभागाने पावसाळा सुरू होण्यापूर्वी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी वाहनधारकांमधून केली जात आहे.
झाड पडण्याच्या मार्गावरकाळा कडा उतरून काही अंतर पार केल्यानंतर डोंगर उतारावर भले मोठे झाड नजरेस पडते. या झाडाच्या पायाखालची माती काढण्यात आली असून, त्याचा पाया कमकुवत झाला आहे. वादळ - वारेच नव्हे तर कोणत्याही क्षणी हे झाड उन्मळून घाटरस्त्यात पडू शकते.
...याची आहे आवश्यकता
- पाऊस सुरू झाला की, केळघर घाटात दरड कोसळण्याच्या घटना सुरू होतात.
- त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व घाटरस्त्यांचे सर्वेक्षण करावे.
- धोकादायक दरडी हटवाव्यात, संरक्षक कठड्यांची बांधणी करावी.
- धोकादायक वळणांवर रिफ्लेक्टर बसवून आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवावी.