सातारा : सातारा शहरातील नागरिक व पक्ष्यांच्या जिवास धोका निर्माण होत आहे. शहरात अंतर्गत भागात रस्त्याकडेला व घरांवर विद्युत तारा लोंबकळत आहेत. या तारांतील विद्युत प्रवाहामुळे वटवाघळेही मृत्युमुखी पडली आहेत.
उपमार्गावर कचरा
सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या उपमार्गावर येथील उड्डाण पुलाखाली स्थानिक व्यापारी, दुकानदार, नागरिक मोठ्या प्रमाणात कचरा टाकत आहेत. त्यामुळे उपमार्गावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे.
महामार्गावर फांद्यांचा धोका वाढला
नागठाणे : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत दुतर्फा असणाऱ्या झाडांच्या फांद्या अपघाताला निमंत्रण देत आहेत. अनेकदा या वाढलेल्या आणि जीर्ण झालेल्या फांद्या जीवघेण्या ठरत असून, वाहनधारकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत दुतर्फा मोठी झाडे वाढली आहेत. या वाढलेल्या झाडांच्या फांद्या महामार्गावर लोंबकळत आहेत.
कुत्र्यांमुळे अपघात
सातारा : सातारा शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या संख्येने कुत्र्यांचा उपद्रव आजवर वाढला होता. त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत असतानाच महामार्गावरही कुत्रे वाहनांच्या आडवे येत आहेत. त्यांना धडकल्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. अपघाताला कारणीभूत ठरत असलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
दुचाकी चोऱ्यांमध्ये वाढ
सातारा : सातारा शहराच्या उपनगरांमध्ये घरासमोर लावलेल्या दुचाकी चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सदर बझार येथील गॅरेजमधूनही एक दुचाकी चोरीला गेली होती. त्यामुळे दुचाकीधारकांचे धाबे दणाणले आहेत. शहरातील दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असतात. त्यामुळे दुचाकी चोरट्यांचा माग काढणे सोपे जाते. मात्र, उपनगरांमध्ये चांगल्या गुणवत्तेचे कॅमेरे नसल्यामुळे भीतीचे वातावरण आहे.
फिरण्यासाठी गर्दी
सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात दोन दिवसांपासून थंडीची लाट वाढली आहे. तरीही ज्येष्ठ नागरिक तसेच काही महिला आरोग्याबाबत सजग आहेत. ते न चुकता दररोज पहाटे फिरण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. ऊबदार कपडे घालून ते राजपथावरून नगरपालिकापर्यंत जातात, तर काहीजण सायकलवरून फेरी मारत आहेत.
खंबाटकी घाटात रांगा
खंडाळा : सलग सुट्टया असल्याने गावी येण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच महाबळेश्वर, पाचगणी, कास, बामणोलीला पर्यटक वाढले आहेत. त्यामुळे पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटात रविवारी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यातून कंटेनरसारखे वाहन आडवे आल्याने खोळंबा होत होता.
रस्ता दुभाजकातून शोभेची रोपे चोरीस
सातारा : सातारा शहरातील पोवई नाका परिसरात ग्रेड सेपरेटरचे काम युद्धपातळीवर सुरू असून वरच्या बाजूस रस्ता दुभाजकात शोभेची रोपे लावण्यात आली आहेत. मात्र, रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तींनी ही शोभेची रोपेच चोरून नेली आहेत. त्यामुळे सातारकरांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून रोपे चोरट्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.
पावसामुळे थंडी..
सातारा : शहरासह परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर गार वारे वाहत आहेत. त्यामुळे वातावरणात गारठा निर्माण झाला आहे. साहजिकच स्थानिकांना हुडहुडी भरली आहे. सकाळी उशिरापर्यंत कोणीही बाहेर पडत नव्हते. अनेकांनी घरात बसणेच पसंत केले होते.