.........................................
गतिरोधकाची मागणी
सातारा : सातारा शहरातील नवीन प्रशासकीय इमारतीजवळ भरधाव वाहनांमुळे अपघात घडत आहेत. त्यामुळे संबंधितांनी येथील रस्त्यावर गतिरोधक उभारावेत, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.
.........................................
ध्वनिप्रदूषणाने त्रास
सातारा : सातारा शहरातील प्रमुख रस्त्यावरुन डांबरीकरण करण्यात आलेले आहे. त्यामुळे साहजिकच वाहनांचा वेग वाढला आहे. या ठिकाणाहून जाणाऱी वाहने कर्णकर्कश हाॅर्न वाजवत असतात. त्यामुळे ध्वनिप्रदूषणाला निमंत्रण मिळत आहे.
.....................
खड्डेमुक्तीने त्रास कमी
वडूज : खटाव तालुक्यातील बहुतांशी मुख्य रस्त्यावरील खड्डे मुजविल्याने चालकांसहित वाहनधारकांना होणारा शारीरिक व आर्थिक त्रासाचे प्रमाण कमी झाला आहे. यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. तर संबंधित प्रशासनाने उपाययोजना केल्याने त्यांचे आभार मानले आहेत.
........................
कठड्यांची गरज
दहिवडी : माण तालुक्यातील अनेक मार्गावर जुने पूल आहेत. या पुलावरील संरक्षक कठडे अज्ञात वाहनांच्या धडकेमुळे ढासळले आहेत. पण त्यांची डागडुजी पुन्हा झालेली नाही. रात्रीच्या अंधारात रस्त्याच्या अंदाज न आल्यामुळे अपघातांचा धोका वाढत आहे. या ठिकाणी भिंत किंवा लोखंडापासून संरक्षक कठडे करण्याची मागणी परिसरातील नागरिकांमधून केली जात आहे.
....................
पर्यटकांत वाढ
महाबळेश्वर : महाबळेश्वर परिसरातील निसर्ग राज्यभरातील हौसी पर्यटकांना आकर्षित करत आहे. सध्या थंडीचे दिवस असल्याने महाबळेश्वरमध्ये आल्हादायक वातावरण आहे. त्यामुळे पर्यटकांची पावले महाबळेश्वरच्या दिशेने वळायला लागली आहेत. शाळांच्या सहलीचे प्रमाण कमी झाले असले तरी हौसी पर्यटक महाबळेश्वरला येऊन काश्मीर पर्यटनाचा आनंद घेत आहेत.
..................................
प्रवाशांची गैरसोय
शिरवळ : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाचे ठिकाण असलेल्या शिरवळ बसस्थानकाची दुरवस्था झाली आहे. या बसस्थानकाची नियमित स्वच्छता करावी, अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे. अनेक वाहनचालक शिरवळ बसस्थानकात न येता अल्पोपाहारासाठी महामार्गावरील खासगी हॉटेलमध्ये थांबणे पसंत करतात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
......................................................
विजेचा लपंडाव
दहीवडी : माण तलुक्यातील अनेक भागात विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. अनेकदा रात्रभर वीज गायब होत असल्याने ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पिके वाळून चालली असताना विजेअभावी पिकांना पाणी देता येत नाही.
...................................
ढगाळ वातावरण
दहीवडी : माण तालुक्यातील दहीवडीसह परिसरात गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. त्यामुळे हरभरा, मका, कांदा, वाटाणा यावर किडीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे.
..........................................
महामार्गावर कचरा
सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा हद्दीत ठिकठिकाणी कचरा साठून पडलेला असतो. हा कचरा संबंधित विभागाने तो तातडीने उचलून त्याची योग्य त्या ठिकाणी विल्हेवाट लावावी, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे. या प्रकारामुळे असंतोष व्यक्त केला.
..............................
अस्ताव्यस्त पार्किंग
सातारा : साताऱ्यातील अनेक वसाहतींमध्ये राहत असलेल्या मालकांपेक्षा वाहनांची संख्या जास्त असते. त्यामुळे वाहने कोठे उभी करायची, असा प्रश्न असतो. त्यातच काही वाचनचालक अस्ताव्यस्त गाड्या उभ्या करतात. त्यामुळे इतरांना गाड्या उभ्या करण्यास जागा मिळत नाही. त्यातून वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत. काळजी घेण्याची गरज आहे.
.............................
रेवड्यांना मागणी
सातारा : संक्रांतीला एकमेकांना तिळगूळ देण्याची पद्धत आहे; पण अलीकडच्या काही वर्षांपासून तिळगूळ देण्याचे प्रमाण कमी झाले असून, रेवड्या दिल्या जात आहेत. त्यामध्येही विविध प्रकारच्या रेवड्यांना मागणी असते. मात्र रेवड्या बाजारात आल्या नसल्याने नागरिकांना प्रतीक्षा लागली आहे.