वाहतुकीस धोका
सातारा : सातारा-मेढा-महाबळेश्वर या मार्गावर अनेक ठिकाणी रिफ्लेक्टर तसेच दिशादर्शक फलक नसल्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. प्रामुख्याने केळघर घाटातील धोकादायक वळणांवर कोठेही दिशादर्शक फलक नसल्याने वाहनधारकांंची फसगत होत आहे. बुधवारी रात्री केळघर घाटात झालेल्या अपघाताने वाहनधारकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने अत्यावश्यक ठिकाणी रिफ्लेक्टर लावावेत, घाटातील संरक्षक कठड्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.
सातारा शहरात
पाण्याचा अपव्यय
सातारा : उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने शहर परिसरात पाणी टंचाई भेडसावू लागली आहे. असे असताना काही नागरिकांसह व्यापाऱ्यांकडून पाण्याची नासाडी केली जात आहे. मात्र, अद्यापही पालिकेने कारवाई मोहीम हाती घेतली नाही. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कासचा पाणीसाठा झपाट्याने खालावू लागला आहे. तांत्रिक अडचणींमुळे शहापूर योजनेचा पाणीपुरवठा वारंवार बंद ठेवावा लागतो. या परिस्थितीत पाणी काटकसरीने वापारण्याऐवजी काही नागरिक, व्यापारी नासाडी करीत आहेत. बोगदा परिसर, गुरुवार पेठ, शनिवार पेठ, देवी चौक, केसरकर पेठ व माची पेठेत काही ठिकाणी हे चित्र दररोज पाहावयास मिळत आहे.
कास तलावावरील
साकव पूल नादुरुस्त
पेट्री : कास तलावाचा संपूर्ण परिसर कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी बहुतांशी पर्यटकांचा ओघ तलावाच्या मुख्य व्हॉल्व्हकडे असतो. या मुख्य व्हॉल्व्हकडे जाणारा साकव पूल धोकादायक स्थितीत आहे. असे असताना कित्येक तरुण, तसेच पर्यटक धोका पत्करून या साकव पुलावरून ये-जा करत आहेत. मुख्य व्हॉल्व्हकडे जाणाऱ्या साकव पुलाची दुरवस्था पाहता अपघाताचा धोका वाढला आहे. सातारा पालिकेकडून या पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.