सातारा : ‘राज्यात अतिवृष्टीने १०० पेक्षा अधिक लोकांचा जीव गेला आहे. भूस्खलनाच्या घटनाही वाढल्या आहेत. त्यामुळे दरडींचा धोका असणाऱ्या गावांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करावे. त्याचबरोबर नदीजोड प्रकल्प कार्यक्रमही राज्याने हाती घ्यावा,’ अशी आग्रही मागणीच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.
सातारा येथे शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री आठवले बोलत होते. ‘रिपाइं’चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, आप्पा तुपे आदी उपस्थित होते. आठवले यांनी वाई तालुक्यात भूस्खलन झालेल्या देवरुखवाडी, कोंढावळे गावाला भेट दिली. त्यानंतर साताऱ्यात येऊन त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
मंत्री आठवले म्हणाले, ‘आता झालेल्या अतिवृष्टीत सातारा जिल्ह्यातील ४१६ गावे बाधित झाली आहेत. ४० हून अधिक लोकांचा जीव गेला आहे, तर काहीजण बेपत्ता आहेत. राज्य शासनाने मृतांच्या नातेवाइकांना ५ लाख, तर केंद्राने २ लाख देण्याचे जाहीर केले आहे. आमची मागणी अशी आहे की, जखमी असणाऱ्यांनाही ५० हजारांची मदत देण्यात यावी, तसेच दरडीचा धोका असणाऱ्या गावांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करावे. त्यासाठी राज्य शासनाने समिती नेमावी. सद्य:स्थितीत दरड कोसळलेल्या भागात लोकांचे राहणे धोक्याचे आहे. त्यासाठी अशा लोकांचे तात्पुरते पुनर्वसन करण्याची गरज आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार करणार आहे.
पूर्वी पावसाची वाट पाहायला लागायची, पण यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. महापुराच्या घटना टाळण्यासाठी नदीजोड प्रकल्प कार्यक्रम हाती घ्यावा. राज्य शासनाने या कार्यक्रमाला महत्त्व देण्याची गरज आहे. त्यासाठी आराखडा तयार करावा. याबाबत केंद्र शासनाशीही चर्चा करणार आहे, असेही केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी स्पष्ट केले.
पाण्याचा विषयही पत्रकार परिषदेत निघाला. यावेळी त्यांनी बारामतीकरांनी सर्वांना न्याय दिला आहे. मलाही त्यांनी न्याय दिला. त्यामुळे खंडाळ्यालाही पाणी मिळावं, असं मंत्री आठवले यांनी सांगितले.
चौकट :
माझ्या गाडीला वातावरण खराब नव्हतं...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाटण दौऱ्यावर येणार होते. हवामान खराब असल्याने हेलिकॉप्टर खाली उतरलं नसल्याने ते माघारी गेल्याचा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर मंत्री आठवलेंनी माझ्या गाडीला वातावरण खराब नव्हते म्हणून मी आलो. तसेच मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यात एकदा यावे. त्यांनी हेलिकॉप्टर परत आणावे, असे सांगताच एकच हशशा पिकला.
................................................
मी करणार नाही चारोळी...
पत्रकारांनी मंत्री आठवले यांना चारोळी करण्याबाबत विनंती केली. यावर आठवले यांनी ‘मी देत आहे सगळ्या पहाडांना आरोळी.. मी करणार नाही आता चारोळी’ अशी चारोळी सादर करत वातावरण आणखी हलके करून सोडले.
..............................................................