खटाव : खटाव ग्रामपंचायत इमारतीच्या अगदी जवळच असलेला विजेचा लोखंडी खांब धोकादायक स्थितीत उभा आहे. हा खांब तळातूनच पूर्ण तुटल्यामुळे कधीही मोठा अनर्थ घडू शकतो. त्यामुळे तो तातडीने हटविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
या वीजखांबावरून अनेक घरांना विद्युत जोडणी दिलेली आहे. या खांबावरुन जोडणी सुरू असल्यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो. सध्या हा खांब इतक्या धोकादायक स्थितीत उभा आहे की, जरा जरी वाहनाचा धक्का बसला किंवा जोराचे वारे आले तरी जवळच असलेल्या ग्रामपंचायत इमारतीवर किंवा शेजारी असलेल्या पिठाच्या गिरणीवर तसेच राहत्या इमारतीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे.
नेहमी गजबजलेल्या ग्रामपंचायतीच्या चौकात हा वीजखांब धोकादायक स्थितीत उभा असल्याने तसेच येथून वाहनांची सदैव ये-जा सुरू असल्यामुळे मोठा अनर्थ होण्याची दाट शक्यता आहे. संभाव्य धोका लक्षात घेता, हा खांब तेथून तत्काळ हटवून त्याठिकाणी नवीन खांब बसवावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
कॅप्शन : २८ खटाव-खांब
खटाव ग्रामपंचायतीच्या चौकात असलेला वीजखांब तुटलेला असल्याने धोका निर्माण झाला आहे. (छाया : नम्रता भोसले)