सातारा : सातारा शहरात ३१२ इमारती या धोकादायक असल्याची बाब पालिकेच्या सर्वेक्षणात समोर आली आहे. बहुतांश इमारती या मालक आणि भाडेकरू यांच्यातील वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने धोकादायक इमारतींचा आकडा दरवर्षी वाढतच आहे. कमानी हौद परिसरातील धोकादायक इमारतीचा काही भाग रस्त्याच्या दिशेने ढासळला आहे. ही इमारत कोणत्याहीक्षणी ढासळू शकते. सद्यस्थितीत या इमारतीत कोणीही वास्तव्य करीत नसले तरी पालिकेने संभाव्य धोका लक्षात घेऊन इमारत पाडण्याबाबत कार्यवाही करणे गरजेचे बनले आहे.
यवतेश्वर घाटातील संरक्षक कठडे गायब
सातारा : सातारा-कास मार्गावर असलेल्या यवतेश्वर घाटातील संरक्षक कठड्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणचे कठडे पूर्णपणे ढासळले असून, वाहनधारकांसह पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येऊ लागला आहे. नववर्षानिमित्त अनेक पर्यटकांची पावले सध्या कास, बामणोली या पर्यटनस्थळांकडे वळू लागली आहेत. या पर्यटकांना यवतेश्वर घाटातूनही ये-जा करावी लागते. आधीच खड्ड्यांमुळे रस्त्याची अवस्था बिकट झाली असताना आता संरक्षक कठड्यांची दुरवस्था झाल्याने घाटमार्ग वाहतुकीस धोकादायक ठरत आहे. संरक्षक कठड्यांची तातडीने डागडुजी करणे गरजेचे बनले आहे.
गळतीमुळे होतोय पाण्याचा अपव्यय
सातारा : पालिकेच्या जुन्या प्रवेशद्वाराजवळ तसेच कूपर कारखान्याजवळील मुख्य व्हॉल्व्हला मोठ्या प्रमाणात गळती लागली असून, पाण्याचा दररोज अपव्यय होत आहे. पाणी वाया जात असूनही पाणीपुरवठा विभागाकडून अद्याप दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले नाही. दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की सातारकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यावर तोडगा म्हणून पालिकेकडून पाणी कपात केली जाते. पाणी बचतीसाठी पालिका विविध उपाय करीत असताना, दुसरीकडे गळती काढण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.