वरकुटे-मलवडी : माण तालुक्यातील म्हसवड ते वरकुटे-मलवडी रस्त्यावर शिरतावजवळील पुळकोटी फाटा ते इनामदार वस्ती दरम्यानच्या नऊ किलोमीटर रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य वाढले असून, रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता, हे ओळखणे कठीण झाले आहे. ठिकठिकाणी खचलेला रस्ता आणि खोल-खोल निर्माण झालेल्या खड्ड्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.
बांधकाम विभागाने म्हसवडपासून शेनवडीपर्यंतच्या जवळपास १८ किलोमीटर रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी टेंडर काढून पाच ते सहावेळा म्हसवडपासून शेनवडीपर्यंत खड्डे भरण्याचे काम खासगी ठेकेदाराकडून करून घेतले. मात्र, अधिकाऱ्यांच्या कृपाशीर्वादाने खड्डे भरण्यासाठी डांबर कमी आणि माती-वाळूमिश्रित खडी जास्त वापरून रस्त्याची मलमपट्टी केली गेली, तर साइडपट्ट्या भरून घेतल्या नसल्याने ठिकठिकाणी रस्ता तुटून अरुंद झाला आहे. यापैकी म्हसवड ते शिरतावजवळील पुळकोटी फाटा या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण झाले आहे, तर शेनवडी ते वरकुटे-मलवडीतील इनामदारवस्ती या रस्त्याचे सुद्धा नव्याने डांबरीकरण करण्यात आले आहे. मधेच असणारा पुळकोटी फाटा ते इनामदार वस्ती या ९ किलोमीटरच्या रस्त्याची अत्यंत दयनीय आवस्था झाल्याने ग्रामस्थांसह नियमितपणे ये-जा करणाऱ्या वाहनधारकांच्या वाहनांचा खुळखुळा तर अंगाचा खिळखिळा होत असल्याने प्रवासी पुरते बेजार झाले आहेत. दोन मोठी वाहने समोरा-समोर आल्यास रस्त्यावरून वाहनाचे एका बाजूचे चाक खाली उतरवावे लागत आहे. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच या रस्त्याची चांगल्याप्रकारे दुरुस्ती अधिकारी वर्गाने करून घ्यावी, अशी मागणी वरकुटे-मलवडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह वाहनधारक करत आहेत.
(कोट)
माण तालुक्यात एकमेव म्हसवड हे शहर असून, वरकुटे-मलवडी पंचक्रोशीतील सर्व गावातील ग्रामस्थांना अनेक वेगवेगळ्या महत्त्वाच्या कारणास्तव वारंवार शहराकडे धाव घ्यावी लागत असते; परंतु अनेक वर्षे झाली तरी रस्त्याकडे अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनीही पाठ फिरवल्याने पुळकोटी फाटा ते इनामदार वस्ती या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन रहदारीसाठी रस्ता सुयोग्य करावा.
-डॉ. आनंदराव खरात,
सामाजिक कार्यकर्ते, वरकुटे-मलवडी
१६वरकुटे मलवडी
माण तालुक्यातील म्हसवड ते वरकुटे-मलवडी रस्त्यावर शिरतावजवळील पुळकोटी फाटा ते इनामदार वस्ती दरम्यानच्या नऊ किलोमीटर रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य वाढले आहे.