सणबूर : बनपुरी, ता. पाटण येथील वांग नदीवरील पायपुलाचे पिलर तुटल्याने अनेक वर्षांपासून नदीपात्रावर लोबंकाळणारा पूल धोकादायक बनला आहे. नदीकाठी कपडे धुण्यासाठी व शेतात ये-जा करणाऱ्या शेतकऱ्यांची या पुलाकडून सतत वर्दळ असते. हा पूल कधी कोसळेल, हे सांगता येणार नाही.बनपुरी गाव आणि आणि वाड्यावस्त्या वांग नदीच्या दुतर्फा वसल्या आहेत. नदी पलीकडच्या ग्रामस्थांना व विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी ३५ ते ४० वर्षांपूर्वी येथील नदीवर पायपूल उभारण्यात आला. नदीपात्रात दगडी पिलर उभारून त्यावर लोखंडी अँगलमधील पुलाचा सांगाडा आणि त्यावर ये-जा करण्यासाठी लाकडी फळ्या बसविण्यात आल्या.
या पुलामुळे परिसरातील ग्रामस्थांची चांगली सोय झाली होती. नदी ओलांडणे सहजशक्य झाले होते. मात्र, पावसाळ्यात पुराच्या पाण्याच्या तडाख्याने पाच-सहा वर्षांपूर्वी पायपुलाचा दगडी पिलर निसटला. परिणामी, हा पूल लोबंकळू लागल्याने त्यावरील रहदारी बंद करण्यात आली.मात्र, संबंधित विभागाने तो धोकादायक पूल तेथून हटवला नसल्याने तो लोंबकाळणाºया पिलरवरच उभा आहे. या लोंबकळणाºया पुलावरूनच परिसरातील ग्रामस्थ धोकादायक पद्धतीने ये-जा करीत असतात. या सततच्या वर्दळीमुळे दुर्घटनेची भीती व्यक्त होत आहे.
अलीकडे येथील कमी उंचीचा पूल हटवून पुरेशा उंचीचा पूल उभारल्याने बनपुरी परिसरातील दळणवळण पावसाळ्यातही सुरळीत राहत आहे. जुन्या पुलाचा आता काहीच उपयोग नसल्याने तो कोसळून दुर्घटना घडण्यापूर्वी संबंधित विभागाने तातडीने तो हटविणे गरजेचे आहे.