कुसूर : मलकापूर येथील ढेबेवाडी फाट्यापासून ते ढेबेवाडीपर्यंतच्या मार्गावर अनेक ठिकाणी धोकादायक वळण आहेत. या वळणांपैकी शिंंदेवाडी येथील वळण जास्त धोकादायक असल्याने या ठिकाणी रात्रीच्या वेळी अपघात होत आहेत. या वळणावरून भरधाव वाहनावरील चालकांचा ताबा सुटून वाहने नजीकच्या ओढ्यात जात आहेत. या ठिकाणी दिशादर्शक व सूचना फलक नाहीत.
गटारची दुरवस्था
क-हाड : पालिकेच्या आवारात अंतर्गत रस्त्याच्या कडेला असलेल्या भाजी मंडई परिसरात अनेक ठिकाणी गटारांची दुरवस्था झाली आहे. पाणी तुंबल्याने परिसरात अस्वच्छतेमुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे मंडईतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
जनावरांमुळे त्रास
क-हाड : शहरातील बसस्थानक, भाजी मंडई, विजय दिवस चौक परिसरात मोकाट जनावरांची संख्या वाढली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन प्रवाशांनाही या जनावरांचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच मंडईमध्ये जनावरांची वर्दळ वाढत आहे. पालिकेने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
पादचारी मार्ग दुरवस्थेत
ओगलेवाडी : कृष्णा कॅनॉल ते कॉलेज रस्त्याकडेला असलेल्या पादचारी मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी कठडे ढासळले आहेत. तसेच त्याखालील नाल्यातील सांडपाणीही रस्त्यावरून वाहत आहे. सांडपाण्याची दुर्गंधी परिसरात पसरत आहे. याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. तसेच कृष्णा कॅनॉलपासून बनवडीपर्यंतचा रस्ताही दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.