निवी, कसणी, मत्रेवाडी, मेंढ, निगडे, घोटील, म्हाइंगडेवाडी आदी दुर्गम वाड्या-वस्त्यांच्या दळणवळणाच्या संपर्कासाठी उपयुक्त असलेला मत्रेवाडी घाट रस्ता अनेक वर्षांपासून गैरसोयीच्या दलदलीत फसलेला आहे. अत्यंत अरुंद रस्ता, तीव्र उतार व वळणे आणि सुरक्षा कठड्यांचा अभाव यामुळे वारंवार तेथे अपघात होतात. आतापर्यंत अनेकजण तेथील अपघातात जखमी झाले असून, काहींनी जीव गमावावा लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत. घाटातील मराठवाडी धरणानजीकचे वळण तर अत्यंत जीवघेणे आहे. तीव्र उतारावर वळण असल्याने ब्रेक लागला नाही तर वाहन धरणाच्या जलाशयात किंवा दरीत कोसळण्याची भीती आहे. गत वर्षात याच ठिकाणी बसचे दोनवेळा अपघात झाले.
कऱ्हाड आगाराची ढेबेवाडी-निगडे-म्हाइंगडेवाडी ही एकमेव बस या मार्गावरून धावत असते. अलीकडे वडापसह खासगी वाहनांचीही घाटात वर्दळ वाढली आहे. मेंढ, तळमावले, ढेबेवाडी येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या त्यात सर्वाधिक असते.
- चौकट
दोन जिल्ह्यांना जोडणारा घाटमार्ग
सातारा व सांगली जिल्ह्यांच्या सीमेवरील अनेक दुर्गम गावे आणि वाड्या-वस्त्यांना जोडणारा हा घाटमार्ग सुरुवातीपासूनच धोकादायक बनला आहे. तरी या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना उभारण्याकडे संबंधित प्रशासनाकडून लक्ष दिले जात नसल्याचे दिसते. घाटाच्या धोकादायक स्थितीमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.