सातारा : फलटण येथे गेल्या काही दिवसांपासून पसरलेल्या डेंग्यूसदृश साथीमुळे फलटणसह जिल्ह्यात घबराटीचे वातावरण पसरले आहे. डेंग्यूमुळे एक रुग्ण दगावल्याने जिल्हा आरोग्य विभागार्फत जिल्ह्यात अनेक ठिकाणी आरोग्य तपासणी मोहीम सुरू केल्यामुळे डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. ‘इडिस इजिप्ती’ डासांपासून डेंग्यू होत असल्याने नागरिकांना या डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे बनले आहे.प्रामुख्याने शहरी भागात ‘इडिस इजिप्ती’ जातीच्या डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होते. डबके, वाहनांचे रिकामे टायर, मडकी अशा वस्तूंमध्ये साचलेल्या पाण्यामुळे या डासांचा फैलाव होतो आणि हेच डास चावल्यामुळे नागरिकांना डेंग्यूसारख्या तापाचा सामना करावा लागतो. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूबाधित रुग्ण आढळून येत आहे. अशातच एका रुग्णाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. डेंग्यूबाधित रुग्णांचे प्रमाण जरी अत्यल्प असले तरी नागरिकांना आताच खबरदारीच्या सर्व उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे. जिल्हा आरोग्य विभागाने देखील यादृष्टीने ठोस पावले उचलून जिल्ह्यात विविध ठिकाणी आरोग्य पथकांमार्फत आरोग्य तपासणी व स्वच्छता मोहीम सुरू केली आहे.डासांचे अनेक प्रकार आहेत. मात्र ‘इडिस इजिप्ती’ जातीच्या डासांमुळे डेंग्यूसारख्या साथरोगाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे याचा नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होत आहे. हा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी घर, परिसर स्वछता करण्यास प्राधान्य दिले आहे. (प्रतिनिधी)
डेंग्यूमुळे जिल्ह्यात भीतीची साथ!
By admin | Published: October 31, 2014 11:19 PM