सातारा: सातारा जिल्हा नियोजन समितीवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या शिफारशीनुसार नामनिर्देशीत आणि विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये एकूण १२ जणांना सदस्य म्हणून शासनाकडून मान्यता मिळालेली आहे. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांची सदस्यपदी नियुक्ती झाली आहे.
नियोजन समितीवर विधीमंडळ सदस्यांमधून दोघांची, जिल्हा नियोजनचे ज्ञान असलेले ४ चार सदस्य तसेच सामान्यपणे जिल्हा नियोजन समितीच्या क्षेत्रातील निवासी आणि जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेल्या ८ व्यक्तींची विशेष निमंत्रित म्हणून नियुक्ती करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. विधानमंडळ सदस्यांमधून माणचे आमदार जयकुमार गोरे यांची नियुक्ती झालेलीच आहे. तर जिल्हा नियोजनचे ज्ञान असलेले नामनिर्देशित सदस्य म्हणून प्रदीप अशोकराव साळुंखे (किवळ, ता. कऱ्हाड), राजेंद्र आत्माराम यादव (कऱ्हाड), प्रदीप माने (शिरवळ, ता. खंडाळा), धैर्यशील ज्ञानदेव कदम (पुसेसावळी, ता. खटाव) यांची नियुक्ती झाली आहे. तर जिल्हा नियोजनचे अनुभव असलेले विशेष निमंत्रित म्हणून आठजणांची नियुक्ती झाली आहे. यामध्ये राहुल प्रकाश बर्गे (कोरेगाव), संतोष जाधव (जळगाव, ता. कोरेगाव), अभयसिंह उदयसिंह घाडगे (बुध, ता. खटाव), जयवंत देवजी शेलार (कोयनानगर, ता. पाटण), चंद्रकांत बाळासो जाधव (तासगाव), वासुदेव हणमंत माने, (रा. रहिमतपूर), पुरुषोत्तम बाजीराव जाधव (रा. अतिट, ता. खंडाळा) आणि रणजित नानासो भोसले (सातारा) यांचा समावेश आहे.
राज्य शासन निमंत्रित ७ जण
राज्य शासनाने जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ७ जणांना निमंत्रित करण्यात यावे, अशी सूचना केलेली आहे. त्यानुसार ७ जणांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये अतुल भोसले (कऱ्हाड), मनोज घोरपडे (रा. मत्यापूर, ता. सातारा), किरण संभाजीराव बर्गे (रा. कोरेगाव), राजेंद्र मधुकर खाडे (रा. पळशी, ता. माण), सुरभी चव्हाण-भोसले (सातारा), दत्तात्रय धुमाळ (रा. सोनके, ता. काेरेगाव), युवराज उर्फ बाबू सूर्यवंशी (म्हसवड) यांचा समावेश आहे.