कऱ्हाड : शहरातील जुन्या कोयना पुलावर असलेले काही पथदिवे बंद पडले आहेत. त्यामुळे पुलावर रात्रीच्यावेळी अंधाराचे साम्राज्य असते. दुचाकीस्वार, सायकलस्वार तसेच पादचारी या पुलाचा वापर करतात. मात्र, पुलावर अंधार असल्यामुळे रात्री पादचा-यांना या पुलावरून मार्गस्थ होताना जीव मुठीत घेऊन जावे लागते. संबंधित विभागाने पथदिव्यांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
घरकुलांची कामे ठप्प
कऱ्हाड : शासनाकडून मंजूर झालेल्या घरकुलांची कामे सध्या लॉकडाऊनमुळे ठप्प झाली आहेत. बांधकामासाठी लागणारे सिमेंट, वाळू, दारे, खिडक्या यांची दुकाने बंद आहेत. बांधकाम सुरू ठेवण्याची मुभा असली, तरी दुकाने बंद असल्यामुळे घरकुलांची कामे बंद पडली आहेत.
पोलिसांची कारवाई
कऱ्हाड : शहरामध्ये विनाकारण फिरणा-यांवर पोलिसांकडून चौकशी करून कारवाई करण्यात येत आहे. विनाकारण फिरणा-यांची वाहने पोलिसांनी जप्त केली असून वाहतूक शाखेत ती लावण्यात आली आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
साइडपट्ट्या खचल्या
कोपर्डे हवेली : कऱ्हाड - मसूर मार्गावरील रस्त्याकडेला असलेल्या साइडपट्ट्या ठिकठिकाणी खचल्या आहेत. त्यामुळे अपघात होत आहेत. खचलेल्या साइडपट्ट्यांवरून दुचाकी वाहने जात असताना वाहनचालकाचा तोल जाऊन अपघात होत आहेत. रस्त्याच्या साइडपट्ट्या भरण्याची मागणी प्रवाशांसह वाहनधारकांतून केली जात आहे.