किडगाव : मेढा - महाबळेश्वर व वाई मार्गाने सातारा शहरात मोळाचा ओढा या मार्गानेच प्रवेश केला जातो. सातारा शहरात व राजवाडा, बुधवार नाका या मार्गाने या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. मात्र, सातारा शहराचे नाक म्हणून संबोधल्या जाणाऱ्या मोळाचा ओढा परिसरात सध्या अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. त्याला कारणही तसेच आहे.
गेल्या दोन वर्षांपासून मोळाचा ओढा ते शाहू स्टेडियम या मार्गावर जागोजागी रस्ता दुभाजक उभारले गेले. त्याचवेळी या दुभाजकावर पथदिवे दिमाखात उभे केले गेले. मात्र, अद्यापही या दिव्यांखाली अंधारच आहे.
दोन वर्षे झाली तरीही संबंधित विभागाने या दिव्यांना वीजपुरवठा न केल्याने मोळाचा ओढा ते करंजे नाका या मार्गावर रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे पायी चालत जाणाऱ्यांसह महिलांना या मार्गाने जीव मुठीत धरूनच जावे लागते.
तामजाईनगर मोळाचा ओढा परिसरात राहणारा सुशिक्षित वर्ग सकाळी व पहाटेच्या वेळी व्यायाम करण्यासाठी मेढा मार्गाने जात असतो; मात्र या मार्गावर अंधाराचे साम्राज्य असल्याने मनात भीती धरूनच हे लोक या ठिकाणाहून जात असतात.
मोळाचा ओढा चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. मात्र, हे कॅमेरे सध्या बंदावस्थेत असून, शेवटची घटका मोजत आहेत. त्यामुळे रात्री-अपरात्री दुर्घटना घडल्यास सीसीटीव्ही काम करत नसल्याने पुढील तपास करता येणार नाही. हे कॅमेरे जर सुरु ठेवले तर येणाऱ्या आणि जाणाऱ्या लोकांवर नक्कीच ‘वॉच’ राहू शकतो.
चौकट..
लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे...
काही दिवसांपूर्वी या रस्ता दुभाजकावरील गवत काढले असून, हे दुभाजक आता स्वच्छ दिसत आहेत. मात्र, त्यावरील दिवे हे शोपीस म्हणूनच उभे आहेत. या पथदिव्यांना विद्युत जोडणी मिळाल्यास मोळाचा ओढा व सातारा शहराच्या या प्रवेशद्वाराची शोभा नक्कीच वाढणार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे लक्ष देऊन संबंधित विभागाला सूचना देऊन येथील दिवे सुरु करावेत, अशी अपेक्षा वाहनचालक व स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
फोटो आहे..
१७ किडगाव
सातारा शहराचे नाक म्हणून संबोधल्या जाणाऱ्या मोळाचा ओढा परिसरात सध्या अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.