लोकमत न्यूज नेटवर्क
वडूज : तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज शहराची लोकसंख्या सुमारे ३० ते ३५ हजार आहे. या परिसरात शाळा, कॉलेज, विविध शैक्षणिक संस्थांसह रुग्णालये आहेत. तसेच सर्व शासकीय कार्यालये आणि वडूज आगार येथे असल्याने वास्तव्यास असलेल्यांची संख्या जादा आहे. तालुक्यातील नोकरदार वर्ग हे याच शहरात मोठ्या प्रमाणात रहिवासी झाले आहेत.
दैनंदिन सुविधा म्हणजेच कचरा विलगीकरण, गटर स्वच्छता यापलीकडेही नगरपंचायत सुविधा देत असते, मात्र सध्या कोरोना संसर्गच्या काळात शासनाने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे येथील नागरिक तंतोतंत पालन करत आहेत. परंतु शहरातील मुख्य रस्ता व अंतर्गत रस्त्यांवरील दिव्याखाली अंधारच असल्याने वयोवृध्द व महिला वर्गात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
तालुक्याची राजधानी असलेल्या वडूज शहराची गत साडेचार वर्षांपूर्वी ग्रामपंचायतची नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाले होते. केंद्रातून, राज्यातून थेट विकास निधी नगरपंचायतीला प्राप्त होत असतो. तसेच जिल्हा नियोजन व इतर वित्त आयोगाकडूनदेखील निधी मिळतो. ज्या पटीत या शहराचा सर्वांगीण विकास होणे क्रमप्राप्त होते, त्या पटीत झालेला नाही. ही बाब खेदजनक असून, शहराची शोकांतिकाच म्हणावी लागेल. गत वर्षभरापासून तालुक्याची राजधानी असलेल्या वडूज शहरातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ठोस अशी कोणतीच पावले उचलली गेली नाहीत. तर यासंदर्भात नियोजनशून्य कारभार स्पष्टपणे दिसून येत आहे. शहरातील नागरिकांना सोयी-सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असलेल्या नगरपंचायत प्रशासनाने या काळात वडूजकरांची घोर निराशाच केलेली आहे. त्यामुळे तालुक्यातील रुग्ण संख्येत वडूज शहरातील रुग्ण संख्या जास्त आहे.
वडूज शहरातील बहुतांशी बाधित रुग्ण होम आयसोलेशनमध्येच असून, सायंकाळी व पहाटेच्याप्रहरी अंतर्गत रस्त्यांवर फिरत असतात. परंतु रस्त्यावरील विद्युत खांबांवरील दिव्याचा उजेडच गायब झाल्याने अनेक दिव्यातून येथील नागरिकांना सध्या दैनंदिन जीवन व्यतीत करावे लागत आहे.
कोट...
येथील नागरिकांनी स्वतःची काळजी घेत नगरपंचायत प्रशासनाला सहकार्याची भूमिका प्रामाणिकपणे ठेवली आहे. मात्र, संबंधित प्रशासनाकडून अपेक्षित असे कार्य होत नाही. याला सर्वस्वी नियोजनाचा अभाव हेच स्पष्ट होत आहे.
- संजय खुस्पे, नागरिक
कोट..
गत दोन दिवसांपासून रस्त्यावरील विद्युत खांबांवरील तारांची तपासणी महावितरणचे कर्मचारी करत आहेत. काही तांत्रिक बिघाडामुळे तीन दिवसांपासून स्ट्रीटलाईट बंद होती. परंतु दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, लवकरच विद्युत पुरवठा सुरळीत होऊन नागरिकांची गैरसोय दूर होईल.
- विपुल गोडसे, माजी उपनगराध्यक्ष
फोटो: वडूजमधील मुख्य रस्त्यावरील विद्युत खांबावरील दिव्याखाली अंधारच आहे. (छाया : शेखर जाधव )