पेट्री : कास पठार ते महाबळेश्वर या राज्यमार्गावर गव्यांचे दर्शन वारंवार होत आहे. संचारबंदी असल्याने गेल्या काही दिवसांत सातारकरांची पावले या रस्त्याकडे वळल्याने वर्दळ वाढली आहे. काही वेळा दुचाकीचालक आणि गव्यांचा कळप आमने-सामने येत असून, गव्यांच्या संवर्धनासाठी या भागात तातडीने उपाय योजण्याची गरज आहे.
जैवसाखळी धोक्यात
सातारा : डोंगराळ भागात वणवे लावण्याचे प्रमाण वाढत असून, लहान-मोठे जीव आगीत होरपळून मृत्यू पावत असल्याने जैवसाखळी धोक्यात आली आहे. निसर्गातील मानवी हस्तक्षेप न रोखल्यास मानव-वन्यजीव संघर्ष होऊ शकत असल्याने वन विभागाने काळजी घ्यावी, अशी मागणी निसर्गप्रेमींमधून होत आहे.
असुरक्षित जलक्रीडा
सातारा : शहर व जिल्ह्यात अनेक ठिकाणी विहिरी, तळी, कालव्यांमध्ये पोहण्यास जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. बरेचजण केवळ उकाडा असह्य झाला म्हणून, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरताना दिसत आहेत. विशेषत: कालव्यांच्या पाण्याला ओढ असल्याने व्यक्ती बुडण्याच्या घटना घडत आहेत.
पाण्याच्या वेळा बदला
सातारा : येथील काही पेठांमध्ये रात्री, तर काही पेठांमध्ये पहाटे लवकर पाणी येते. पाण्याचा वापर कमीत कमी व्हावा, या हेतूने या वेळा ठेवण्यात आल्या असल्या तरी, पाणीपट्टी मोजून भरणाऱ्यांना वेळेत पाणी मिळावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
मद्यपींना रोखा
सातारा : कास हे नैसर्गिक जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेले स्थळ असून, केवळ हंगामात पैसे गोळा न करता वन खात्याच्यावतीने वर्षभर त्याची देखभाल केली जावी, तेथे बाटल्या आणून दारू पिणाऱ्यांना अटकाव केला जावा, अशी मागणी निसर्गप्रेमींमधून होत आहे.
गुरांची संख्या रोडावली
बामणोली : पशुपालन हा एकेकाळी प्रमुख व्यवसाय असणाऱ्या कास-बामणोली भागातील गुरांची संख्या वेगाने रोडावत चालली असून, तेथील तरुण शहरांत कामानिमित्त धाव घेत आहे. डेअऱ्या बंद पडणे आणि चराऊ कुरणांमध्ये घट, ही यामागील कारणे असल्याचे पशुपालक सांगतात.
शीतपेयांना मागणी
सातारा : तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे शहरात शीतपेयांना मागणी वाढत चालली आहे. शहरात अनेक ठिकाणी आईस्क्रिमच्या दुकानात गर्दी दिसून येत आहे. बाजारपेठेत शीतलता देणाऱ्या कलिंगडांची आवकही वाढत चालली आहे. संचारबंदीच्या मर्यादेमुळे सकाळीच दुकानातून शीतपेये आणून दुपारी सहकुटुंब याचा आस्वाद घेतला जात आहे.