सातारा : खंडणीच्या गुन्ह्यात सुमारे तीन महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत असलेला दत्तात्रय रामचंद्र ऊर्फ दत्ता जाधव याचा जामीन अर्ज मंगळवारी सत्र न्यायालयाने फेटाळला. या प्रकरणात दत्ता जाधवसह पाच जणांना अटक झाली असून, पाच जण फरारी आहेत.बांधकाम व्यावसायिकाला खंडणी मागून त्याच्या कार्यालयात तोडफोड केल्याप्रकरणी दत्ता जाधव व इतरांविरुद्ध १० नोव्हेंबर २०१४ रोजी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच दिवशी दत्ता जाधवला अटक करण्यात आली होती. खंडणी आणि तोडफोडीच्या घटनेत एकूण ५० ते ६० जण सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. दत्ता जाधवचे साथीदार अक्षय सुनील जाधव (वय १९, रा. बसाप्पा पेठ करंजे), संतोष शिवाजी सालकर (वय २५, रा. खेड), मयूर अरुण गवळी (वय २२, रा. एसटी कॉलनी, शाहूनगर) या संशयितांना १८ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. आकाश ऊर्फ बाळू तानाजी खुडे (वय २१, रा. दत्त कॉलनी, म्हसवे रोड, करंजे) या संशयितास २४ जानेवारीला अटक करण्यात आली. हे सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या गुन्ह्यातील महेश गजानन तपासे (रा. मल्हार पेठ, सातारा), धीरज पाटोळे, अनिल महालिंग कस्तुरे, किरण कैलास कांबळे (रा. गुरुवार पेठ), निखिल सूर्यकांत प्रभाळे (रा. करंजे) हे संशयित फरारी आहेत.दत्ता जाधव व त्याच्या साथीदारांनी सातारच्या सत्र न्यायालयात जामीन मिळविण्यासाठी अर्ज केला होता. तो फेटाळल्यावर आरोपींनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. तेथेही तो नामंजूर करण्यात आला. या प्रकरणी पोलीस निरीक्षक रवींद्र पिसाळ यांनी या प्रकरणात मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात दि. ६ फेब्रुवारी रोजी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यानंतर दत्ता जाधवने पुन्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर मंगळवारी सुनावणी झाली. दत्ता जाधवविरुद्ध बरेच गुन्हे दाखल असल्यामुळे त्याला जामीन देऊ नये, असा युक्तिवाद जिल्हा सरकारी वकील विकास पाटील-शिरगावकर यांनी केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून दत्ता जाधवचा जामीन अर्ज फेटाळला. (प्रतिनिधी)
दत्ता जाधवचा जामीन फेटाळला
By admin | Published: March 03, 2015 10:08 PM