फलटण : वेलणकर दत्त मंदिर तथा शनीनगर येथील दत्त घाट म्हणजे मृत्यूनंतरचे क्रियाकर्म तथा दशक्रिया विधी घाटाच्या ठिकाणी अनेक अडचणी निर्माण झाल्या असून, ना इथे स्वच्छता, बसण्याची व्यवस्था, ना पाणी, ना इथे इतर सुविधा. कोट्यवधींचा कर मिळणाऱ्या फलटण नगरपालिकेचे दुर्लक्ष होत असून, पालिका जाणूनबुजून याकडे दुर्लक्ष करीत आहे का, असा सवाल विचारला जात आहे.
बाणगंगा नदीकाठी असणाऱ्या प्राचीन दत्त घाटावर कचऱ्याचे ढीग, अस्वच्छता व दुर्गंधी पसरली असून, दशक्रिया विधीसाठी येणाऱ्या नागरिकांना साचलेल्या कचऱ्यामुळे धार्मिक विधी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बाणगंगा नदीच्या काठावर असणाऱ्या दत्त घाट दशक्रिया विधीच्या शेडमध्ये व आसपास व्यक्तीच्या निधनानंतर अस्थिसंचयन करण्यापासून ते दहा दिवसांपर्यंत विविध विधी यामध्ये समाविष्ट होतात. त्यामध्ये स्नान, मृत्तिकास्नान, एकपिंडदान, विषमश्राद्ध, वपन, पाच मडक्यांवर पोळ्या, छत्र, पादुका, कावळा शिवणे अशा विविध विधींचा समावेश होतो.
कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढल्याने दत्त घाट येथील दशक्रिया विधीच्या शेडमध्ये विधी होत असतात. याठिकाणी लोकांची गर्दी असते. या ठिकाणी असलेले नदीपात्र व परिसर तसेच शेडमध्ये कचरा साठल्यामुळे अस्वच्छता व दुर्गंधीने व्यापला गेला. याठिकाणी अनेक दिवसांपासून नगरपरिषदेकडून साफसफाईकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना घाणीतच धार्मिक विधी करावे लागत आहेत.
फलटणमधील नागरिक पूर्वीपासून दशक्रिया विधी परंपरेप्रमाणे दत्त घाटावर करत असल्याने दररोजच दशक्रिया विधीसाठी नागरिकांची या घाटावर गर्दी असते. परंतु, नगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी कुठल्याही मूलभूत सुविधा नसल्यामुळे नातेवाइकांना यातना सोसाव्या लागत आहेत. शहरातील या घाटावर आल्यानंतर नातेवाइकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याठिकाणी साफसफाई होत नसल्याने कचरा टाकण्यासाठी कचरा कुंडी नसल्याने धार्मिक विधी करण्यापूर्वी कचरा गोळा करून कुठे टाकावा, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. नगर परिषदेचे या ठिकाणी दुर्लक्ष होत असून, किमान या कठीण कालावधीत तरी धार्मिक विधी होत असलेल्या ठिकाणी स्वछता ठेवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
(चौकट)
सध्या येथील विधी वाढल्याने या ठिकाणी शहर व बाहेरील लोक विधीसाठी येतात. मात्र, या ठिकाणी बाणगंगा नदीत साठलेला कचरा, गावाची आणलेली घाण, परिसर स्वच्छ नसल्याने झालेली गटारगंगा दुर्गंधी यामुळे या दत्त घाटावर खूप अडचण होत असून, पालिकेने या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून द्यावी, अन्यथा पुन्हा आंदोलन करू.
- मितेश ऊर्फ काकासाहेब खराडे, सामाजिक कार्यकर्ते
१९फलटण
फलटण शनीनगर येथील दत्त घाटवर नगरपरिषदेकडून साफसफाईकडे दुर्लक्ष होत झाल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे.