सातारा : जिल्ह्यातील एक लाख पाच हजार ९१३ कुटुंबांकडे आजही शौचालय नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्यांच्यात प्रबोधन व्हावे, यासाठी ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत दि. २० नोव्हेंबर रोजी ‘एक दिवस शाळेसाठी’ या उपक्रमासोबतच शौचालय नसलेल्या कुटुंबाना गृहभेटीचा उपक्रम जिल्हा परिषदेमार्फत हाती घेण्यात आला आहे. यामध्ये दहा हजार ६९६ अधिकारी, पदाधिकारी सहभागी होणार आहेत. कुटुंबाना भेटी देऊन शौचालय बांधणीसाठी प्रवृत्त करण्यात येणार आहे. नऊ कुटुंबे दत्तक घेऊन दि. २६ जानेवारीपर्यंत शौचालय बांधण्याबाबत पुढकार घेण्यात येणार आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने याबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती शिवाजी शिंदे, समाजकल्याण सभापती मानसिंग माळवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी गुरुवार, दि. २० रोजी जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या उप्रकमांची माहिती दिली. महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून केंद्र शासनाने दि. २ आॅक्टोबर पासून ‘स्वच्छ भारत मिशन’ या उपक्रमास सुरुवात केली आहे. यामध्ये सातारा जिल्हाही अग्रेसर कसा राहील, यादृष्टीने जिल्हा परिषदेतर्फे उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. सातारा जिल्ह्यात सध्या सुमारे १५०० ग्रामपंचायती आहेत. त्यामधील १,४३५ ग्रामपंचायती निर्मल झालेल्या आहेत. परंतु, २०१२ च्या सर्वेक्षणानुसार आजही जिल्ह्यातील एक लाख पाच हजार ९१३ कुटुंबांकडे शौचालय नाही. या कुटुंबांना शौचालय बांधण्यासाठी प्रवृत्त करणे व त्यांना सहकार्य करण्यासाठी जिल्हा परिषदेअंतर्गत अधिकारी व पदाधिकारी यांनी प्रयत्न चालिवले आहेत. केंद्र शासनाच्या नवीन धोरणानुसार प्रत्येक कुटुंबास शौचालय बांधकाम प्रोत्साहन अनुदान १२ हजार वितरित करण्यात येणार आहे. दि. २० रोजी ‘एक दिवस शाळेसाठी’ या उपक्रमासोबतच शौचालय नसणाऱ्या जिल्ह्यातील कुटुंबाना गृहभेटीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. प्रत्येक तालुक्यातील एका ग्रामपंचायतीपैकी शौचालय नसलेल्या २५ कुटुंबांना भेटी देण्यात येणार आहेत. त्यांना शौचालय बांधण्यासाठी प्रवृत्त करण्यात येणार असून, नऊ कुटुंबे दत्तक घेण्यात येणार आहेत. दि. २६ जानेवारी २०१५ पर्यंत त्यांची शौचालये बांधून घेण्याबाबत पुढाकार घेण्यात येणार आहे. जिल्ह्याला यावर्षी ३४ हजार १९६ शौचालय बांधणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी सुमारे आठ हजारांवर शौचालये बांधून पूर्ण आहेत. उर्वरितांनी शौचालये बांधावीत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे यावेळी सांगण्यात आले. (प्रतिनिधी)एकूण एक लाख सहा हजार ५१२ कुटुंबांना भेटीएकूण १,४५० ग्रामपंचायतींच्या गावात जाणारफलटण तालुक्यात ३१.३८ टक्के कुटुंबाकडे शौचालय नाही (जिल्ह्यात प्रथम)सर्वात कमी प्रमाण महाबळेश्वर तालुक्यात ३.७० टक्के इतकेजिल्ह्यात आजही २०.४७ कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालय नाहीपदाधिकारी, अधिकाऱ्यांनी निवडलेले गावजिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी भेटीसाठी काही गावे निवडली आहेत. तेथे जाऊन शौचालय नसणाऱ्या कुटुंबांना ते बांधकामासाठी प्रवृत्त करणार आहेत. त्याचबरोबर नऊ कुटुंबाना दत्तक घेणार आहेत.जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर दुधेबावी, ता. फलटणजिल्हा परिषद उपाध्यक्ष रवी साळुंखे कोडोली, ता. साताराकृषी सभापती शिवाजी शिंदे काळचौंडी, ता. माणशिक्षण सभापती अमित कदम मेढा, ता. जावळीसमाजकल्याण सभापती मानसिंग माळवे वांझोळी, ता. खटावमहिला व बालविकास सभापती कल्पना मोरे निमसोड, ता. खटावजिल्हाधिकारी अश्विन मुदगल आरफळ, ता. सातारामुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत शिवथर, ता. साताराजिल्हा परिषद अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी शौचालय बांधकामासाठी पुढकार घेतला आहे. त्यासाठी अनेक कुटुंबांना भेटून त्यांच्यात परिवर्तन करण्यात येणार आहे. त्यांना शौचालय बांधकामासाठी प्रवृत्त करण्यात येईल.- जी श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्ह्यात आजही अनेक कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालय नाही. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने नावीण्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. गुरुवार, दि. २० रोजी अधिकारी व पदाधिकारी गावभेटी देणार आहेत.-शिवाजी शिंदे, कृषी समिती सभापती
निर्मलग्रामसाठी ‘दत्तक गाव’ उपक्रम
By admin | Published: November 19, 2014 9:50 PM