सातारा : गणेशमूर्ती मिरवणुकीत ढोल पथकावरही मोठा खर्च करावा लागतो. हाच खर्च वाचविण्यासाठी सदर बझार येथील भारतमाता गणेशोत्सव मंडळाने स्वत:चेच ढोल पथक तयार केले. त्यातून मंडळातील कार्यकर्त्यांना संधी मिळालीच; पण वाचलेल्या पैशांतून विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढावी, यासाठी विविध स्पर्धा घेऊन बक्षीस रूपाने पुस्तके दिले जात आहे. जिल्ह्याच्या सामाजिक परंपरेला शोभेचे काम सदर बझारमधील भारतमाता गणेशोत्सव मंडळ करत आहे. केबल, दूरचित्रवाहिनी अन् मोबाईलमुळे भावी पिढी घरातच बसून राहत आहे. त्यांचे खेळणे व वाचन कमी झाले आहे. ही परिस्थिती सर्वांसाठीच घातक आहे. भावी पिढीला यातून बाहेर काढण्यासाठी अभिनव उपक्रम राबविला आहे. गणेशाचे आगमन असो वा विसर्जन मिरवणूक. अन्य मंडळ मिरवणुकीत डॉल्बी लावतात. मात्र, पर्यावरणाला घातक असल्याने डॉल्बी लावणे भारतमाता गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मान्य नव्हते. त्यामुळे हे मंडळ ढोल पथकाला मिरवणुकीची सुपारी देत होते. अनेक ढोल पथकही या दिवसात मिरवणुकीकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहत आहे. या पथकांची सुपारीही महागली आहे. त्यामुळे गणेशोत्सव, दुर्गोत्सवात ढोल पथकावर हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा मंडळाने अभिनव उपक्रम राबविला. या मंडळाने ढोल पथकासाठी लागणारे साहित्यच खरेदी केले. मंडळाचे कार्यकर्तेही हिरीरीने भाग घेऊन ढोल वाजविण्याचा सराव करू लागले. ज्या कार्यकर्त्यांना वाजविण्याची हौस होती त्यांना यानिमित्ताने कला दाखविण्याची संधी मिळाली. अन् सर्वात महत्त्वाचे म्हणजे गणेशोत्सव, दुर्गोत्सवावर मंडळाचा दरवर्षी होणारा खर्च वाचला आहे. या पैशाचा समाजासाठी उपयोग करावा, हा विचार समोर आला. त्यातूनच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न या मंडळाने केला. यंदा बालवाडीपासून दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी बौद्धिक, शारीरिक स्पर्धा घेतल्या आहेत. या स्पर्धेतील विजेत्यांना पुस्तकरूपाने बक्षिसे दिली जात आहेत. (प्रतिनिधी)दूरचित्रवाहिनी, मोबाईलमुळे विद्यार्थ्यांमधील वाचनाची आवड कमी होत आहे. तसेच ते घरात बसून राहत असल्याने शारीरिक विकासही खुंटत आहे. त्यामुळे मंडळाने निबंध स्पर्धा, स्लो सायकल, धावण्याच्या स्पर्धा घेतल्या आहेत. यामुळे मुलांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. विजेत्यांना पुस्तके भेट दिली जात असल्याने त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण होणार आहे.- सतीश कांबळेविद्यार्थ्यांच्या कलागुणांना वावभारतमाता गणेशोत्सव मंडळाने चित्रकला, रांगोळी, चित्रे रंगवणे, निबंध लेखन, स्लो सायकल आदी स्पर्धा घेतली आहे. या स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळत आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना वाचनीय पुस्तके, चित्रकलेची वही आदी शैक्षणिक वस्तू बक्षिस रूपाने दिले जात आहेत. सीसीटीव्हीचे नियोजनसदर बझारमधील मुख्य चौकात मोठा बाजार भरतो. याच ठिकाणी नागरिकांची मोठी वर्दळ असते. येथील सुरक्षितता वाढावी, यासाठी मंडळातर्फे या चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे लहान-मोठे गुन्हे रोखण्यात यश येणार आहे.
ढोलाच्या पैशातून विद्यार्थ्यांना देणार पुस्तकांची भेट !
By admin | Published: September 09, 2016 11:23 PM