सातारा : जावळी तालुक्यातील सरताळे येथे मृत बैल निर्जन ठिकाणी टाकणं, हे बैलमालकाला भोवलं असून, हा बैल पुण्यातून जावळी तालुक्यात आणून टाकण्यासाठी आणखी चार ते पाचजणांचा समावेश होता, असे तपासात पुढे आलं आहे. अपघातातील मृत बैलावर दफन करून अंत्यसंस्कार केले असते तर या भानगडी वाढल्याच नसत्या. मृत बैल उघड्यावर टाकल्यामुळेच बैलमालकाच्या पाठीमागे कायद्याच्या ससेमिरा लागला.
जावळी तालुक्यातील सरताळे येथे निर्जन ठिकाणी एका बैलाचे पाय तोडून आणि फास लावून हत्या करण्यात आल्याचे समोर आले होते. यानंतर मेढा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर वेगळाच प्रकार समोर आला. या बैलाची हत्या नव्हे तर त्याचा अपघातात मृत्यू झाला होता. मात्र, उघड्यावर टाकून प्राण्यांची हेळसांड केल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे कायद्याने हा गुन्हा आहे. इतरवेळी प्राणी मृत होतात. त्यावेळी मृत प्राण्यांचे रितसर दफन केले जाते. म्हणजेच प्राण्यांच्या मृतदेहाचीही विटंबना न होता त्यांच्यावर रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करणे गरजेचे असते. इथे बैल मालकाचे हेच चुकले. बैलाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर बैलमालकाने संबंधितांकडून भरपाई सुद्धा घेतली. मात्र, त्यानंतर त्या बैलाचा मृतदेह दफन करणे गरजेचे होते. परंतु बैलमालकाने टाळाटाळ करून मृत बैलाची आणखीनच हेळसांड केली. टेम्पोतून बैलाला सरताळेत आणल्यानंतर बैलाला टेम्पोतून उतरण्यात येत होते. त्यावेळी बैलाचे पाय बांधून टेम्पोने ओढून मृतदेह झाडाखाली ठेवला गेला. त्यामुळे या बैलाची फास लावून हत्या झाल्याचे सुुरुवातीला म्हटले गेले.
विशेष म्हणजे बैलाची हत्या केली, अशी कोणीही तक्रार दिली नाही. मात्र, मृत बैलाच्या शरीरावरील खुणा पाहून बैलाचा छळ केल्याचे दिसून येत होते. त्यामुळे पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला.
चाैकट : नमुने फाॅरेन्सिक लॅबला पाठवले
मेढा पोलिसांनी मृत बैल दफन केला होता. मात्र, मृत्यूचे कारण समजण्यासाठी दफन केलेला बैलाचा मृतदेह पुन्हा उकरण्यात आला. त्यानंतर त्याचे शवविच्छेदन जागेवरच करण्यात आले. बैलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे समजण्यासाठी नमुने पुणे येथील फाॅरेन्सिक लॅबला पाठविण्यात आले आहेत. हे नमुने प्राप्त झाल्यानंतर बैलाच्या मृत्यूचे कारण समजणार आहे.
चाैकट : म्हणे बैल जीवंत होता...
अपघातात बैल जखमी झाल्यानंतर कुमार पडवळ (वय २८, रा. कुंभारवाडी, आसले, वाइ) याने पुण्यातून बैल विकत घेतला. जखमी अवस्थेत त्याने बैल गावी आणला. मात्र, त्याचा मृत्यू झाला. बैलाचा मृतदेह दफन करण्याऐवजी त्याने टाळाटाळ करून मृतदेह उघड्यावरच फेकून दिला. त्यामुळे सारा हलकल्लोळ माजला.