आयुषी शिवानंद सासवे (वय ३ वर्षे), आरुषी शिवानंद सासवे (८), आस्था शिवानंद सासवे (९) अशी मृत तीन सख्ख्या बहिणींची नावे आहेत. १४ डिसेंबर रोजी मध्यरात्री या तिन्ही मुलींसह त्यांच्या आईला अचानक उलट्या, जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती बिघडल्याने तिन्ही मुलींना अधिक उपचारार्थ कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी उपचार सुरू असताना १६ डिसेंबर रोजी पहाटे आस्था आणि आयुषी या दोघींचा मृत्यू झाला, तर आरुषीचा तीन दिवसांनी मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, मृत्यू झालेल्या तिन्ही मुलींचा व्हिसेरा तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. नुकताच या व्हिसेराचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. या अहवालानुसार तिन्ही मुलींना विषबाधा झाली नव्हती, असे स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे मुलींच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी पोलीस शवविच्छेदन अहवालावर तज्ज्ञ डॉक्टरांचे मत मागविणार आहेत. डॉक्टरांशी चर्चा करण्यासह वेगवेगळ्या पातळीवर या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास केला जात आहे.
मृत सख्ख्या बहिणींना विषबाधा नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 4:40 AM