सातारा : येथील बॉम्बे रेस्टॉरंट पुलाखाली दुचाकी उभी करून मित्रासोबत गप्पा मारत असताना कंटेनरच्या चाकाखाली सापडून विलास पंढरीनाथ दांडेकर (वय ५५, रा. सिरॅमिक कॉलनी, गोडोली, सातारा) या कापड व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास झाला. याबाबत पोलिसांनी सांगितले, विलास दांडेकर व अन्य एकजण बॉम्बे रेस्टॉरंट पुलाखाली दुचाकी रस्त्याकडेला उभी करून गप्पा मारत उभे होते. यावेळी कोरेगावकडून कंटेनर पुलाखालून पुण्याच्या बाजूकडे जात होता. कंटेनर वळण घेत असतानाच डाव्या बाजूच्या पुढील चाकाखाली विलास दांडेकर यांचा शर्ट अडकला. कंटेनरने त्यांना तब्बल ३५ फूट फरफटत पुढे नेले. त्यांच्या अंगावरून चाक गेल्याने त्यांचा चेंदामेंदा झाला. घटनास्थळाचे चित्र अत्यंत विदारक होते. कंटेनरचालकाला काही लोकांनी ओरडून थांबविले. त्यावेळी दांडेकर यांच्या अंगावर कंटेनरचे चाक होते. काही नागरिकांनी चालकाला धक्काबुक्की केली. त्यानंतर घटनास्थळी पोलिस आले. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले. घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे काहीवेळ वाहतूक ठप्प झाली होती. दांडेकर हे कपड्यांचा व्यवसाय करत होते. त्यांची पत्नी बुधवारी पुणे येथे गेल्या होत्या. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्या परत साताऱ्यात आल्या, असे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कंटेनरखाली चिरडून व्यावसायिकाचा मृत्यू
By admin | Published: October 20, 2016 1:29 AM