तांबवे : वास्तुशांतीसाठी मामाकडे गेलेल्या मुलीला व तिच्या वडिलांना सर्पदंश झाला. त्यामध्ये मुलीचा मृत्यू झाला असून तीच्या वडीलांवर विटा येथील रूग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत. प्रियांका अशोक मेढेकर (वय ११) असे मृत मुलीचे नाव आहे तर तिचे वडील अशोक मेढेकर यांच्यावर उपचार सुरू आहेत. खानापूर तालुक्यातील जाधववाडी हे मृत प्रियांकाचे आजोळ आहे. तेथील मामाच्या नवीन घराची वास्तुशांत शनिवारी (दि. २३) होती. या समारंभासाठी शुक्रवारी अशोक मेढेकर हे प्रियांका या आपल्या मुलीला सोबत घेऊन गेले होते. रात्री जेवण झाल्यानंतर अशोक व प्रियांका दोघे इतर नातेवाईक व पाहुण्यांसोबत घरात झोपी गेले. शनिवारी सकाळी नातेवाइकांना जाग आल्यानंतर त्यांनी पाहिले असता अशोक व प्रियांका अत्यवस्थ असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.पाहुण्यांनी त्यांना त्वरित उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. अशोक व प्रियांका यांना सर्पदंश झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. औषधोपचारानंतर अशोक व प्रियांका यांना पुन्हा जाधववाडीला नेण्यात आले. मात्र, शनिवारी रात्री पुन्हा त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना अधिक उपचारासाठी विटा येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी दिवसभर त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना सोमवारी प्रियांकाचा मृत्यू झाला, तर अशोक यांच्यावर उपचार सुरू आहेत. सोमवारी सकाळी प्रियांकाचा मृतदेह तांबवे येथे आणण्यात आला, त्यावेळी कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. प्रियांकावर गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. (वार्ताहर)पाठशिवणीचे ४८ तासशनिवारी सकाळी प्रियांका व अशोक यांना जाग आल्यानंतर घशात खवखव होत असल्याचे प्रियांकाने सांगितले. त्यावेळी दोघांनाही रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, पाणी बदलामुळे असे झाले असावे, असे समजून प्राथमिक उपचार करण्यात आले. शनिवारी दिवसभर प्रियांका व अशोक यांची प्रकृती ठीक नव्हती. अशातच रात्री प्रियांका बेशुद्ध पडल्याने त्या दोघांनाही रविवारी रूग्णालयात हलविण्यात आले होते. सुमारे ४८ तासांच्या पाठशिवणीनंतर मृत्यूने प्रियांकाला गाठलेच.
मामाच्या गावी सर्पदंशाने मृत्यू
By admin | Published: May 25, 2015 10:32 PM