सातारा : कोरोना महामारीच्या काळामध्ये ॲम्बुलन्स चालकांचे महत्व अधोरेखित झालेले आहे. खासगी ॲम्बुलन्स चालक पळापळ करून रुग्णांना दवाखान्यात आणतात. अनेकदा हे रुग्ण दगावल्यानंतर कोरोनाग्रस्त रुग्णाचे शव स्मशानभूमीपर्यंत न्यावे लागते. त्यामुळे चालकांचा मृत्यूसोबत प्रवास सुरु आहे.
अनेकजण अजूनदेखील कोरोनाची टेस्ट न करता घरात बसून राहात आहेत. खोकला, सर्दी, ताप असेल तर घरातच घरगुती उपचार करून घेण्यात धन्यता मानणारे अनेक रुग्ण जेव्हा श्वास गुदमरायला सुरुवात होते. खोकला अतिशय वाढतो तेव्हाच रुग्णालयात जाण्याची तयारी सुरु करतात. अनेकदा नातेवाईक अशा रुग्णांना सहकार्य करत नाहीत. ॲम्बुलन्सला फोन करून सांगितले जाते. ॲम्बुलन्स चालक रात्री - अपरात्री संबंधित रुग्णाच्या घरी जातात. रुग्णाला घेऊन एकटेच रुग्णालयात येतात.
एखाद्या नातेवाईकाप्रमाणे ॲम्बुलन्स चालक सेवा बजावत असले तरीदेखील नातेवाईक मात्र बिलासाठी घासाघीस करत राहतात. ॲम्बुलन्समधील ऑक्सिजनच्या आधारावर पेशंट दवाखान्यात पोचतो. मात्र, तरीदेखील बिल देण्यामध्ये काचकूच केली जात असल्याची शंका व्यक्त करत आहेत. दरम्यान, ॲम्बुलन्स चालक हे फ्रंटलाईन कर्मचारी आहेत. सगळ्यात पहिल्यांदा या लोकांना कोविडची लस देणे गरजेचे होते. मात्र, प्रशासनाने अजूनही त्या लोकांना लस दिलेली नाही. तसेच लस कधी मिळणार आहे, हे पण माहीत नसल्याने या चालकांना मृत्यूसोबतच प्रवास करावा लागतो आहे.
1) पॉईंटर
एकूण रुग्णवाहिका- १४३
कोविडसाठीच्या रुग्णवाहिका- १८
चालक संख्या- १४३
नॉन कोविडसाठी रुग्णवाहिका- १२५
चालक संख्या- १२५
२) 3 प्रतिक्रिया
कोट
रात्री-अपरात्री कॉल आल्यानंतर वाहन घेऊन जावे लागते. अनेकदा झोपेत असतानाच फोन येतो. इमर्जन्सी लक्षात घेऊन ॲम्बुलन्स घेऊन रुग्णांच्या घरी जावे लागते आणि काही ठिकाणी नातेवाईक मदत करत नाहीत. कोरोना पेशंटला आम्हालाच वाहनात बसवून आणावे लागते.
- आनंद जाधव
रुग्णांचे नातेवाईक अनेक कटकटी निर्माण करतात. आम्ही सेवाभावनेतून हे काम करतो. मात्र, पैसे द्यायची वेळ येते, तेव्हा लोक घासाघीस करतात तसेच कोरोनाग्रस्त रुग्ण आपला कोणीच नाही, अशा पद्धतीने काही जण वागले आहेत. बघताना खूप वाईट वाटते.
- राहुल भंडारे
ॲम्बुलन्स चालकांना पहिल्यांदा लक्ष द्यायला हवी होती. मात्र, प्रशासन अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेताना दिसत नाही. तरीदेखील जीवावर उदार होऊन ॲम्बुलन्स चालक सेवा बजावत आहेत.
- शत्रुघ्न शेडगे
गाडीमध्ये ऑक्सिजनची गरज भासते. ऑक्सिजनविना रुग्ण दगावू शकतो, ही भीती लक्षात घेऊन आम्हीच संबंधित रुग्णाला ऑक्सिजन लावतो. शासनाने आम्हाला पहिल्यांदा लस द्यावी.
- अर्जुन चव्हाण