कऱ्हाड : ‘महाराष्ट्रात १९६० साली मांडल्या गेलेल्या कृषी औद्योगिक समाजरचनेच्या धोरणानुसार असंख्य सहकार चळवळीची केंद्रे ग्रामीण भागात निर्माण झाली. राज्य सरकार इतकीच समाज परिवर्तनाची कामे या सहकाराच्या माध्यमातून घडली आहेत. दुर्दैवाने हल्लीच्या काळात सहकार चळवळीतून निर्माण झालेल्या भांडवलाच्या आधारावर पदाधिकारीच खासगी संस्था निर्माण करू लागले आहेत. सहकारी संस्थेसारखा व्यवहार करणाऱ्या खासगी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना सहकारामध्ये पदाधिकारी बनता येणार नाही, असा कायद्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे. मात्र, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. परिणामी सहकारातील लोकशाहीची मृत्युघंटा वाजत आहे,’ असे मत भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांनी व्यक्त केले.
येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डाॅ. मोहिते बोलत होते. यावेळी डॉ. सुधीर जगताप, मनोहर थोरात, मारुती निकम आदींची उपस्थिती होती. ज्येष्ठ नेते दिवंगत यशवंतराव मोहिते यांचा रविवार (दि. २२) रोजी स्मृतिदिन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सहकार चळवळीतील वाटचालीविषयी त्यांनी आपली मते मांडली.
डॉ. मोहिते म्हणाले, ‘दुष्ट, विकृत व लबाड लोकांमुळे नाही; परंतु विपरीत परिस्थितीबद्दल काही न करता बघ्याची भूमिका घेणाऱ्या लोकांमुळे सहकार विश्व धोकादायक परिस्थितीत आले आहे. काही जण स्वतःची आर्थिक व राजकीय ताकद वापरून सहकार चळवळीला खासगीत रूपांतर करू पाहत आहेत. नवीन सत्ता व संपत्ती यावर आधारित गुलामगिरी निर्माण करण्याचे त्यांचे मनसुबे आहेत.
दबावाखाली नमणाऱ्या लेखापरीक्षकांनी केलेल्या चौकशांच्या आधारावर सहकार कायद्यानुसार ८३, ८८, ८५ कलमाखाली असंख्य तक्रारी शासन दरबारी २० ते ३० वर्षांपासून प्रलंबित आहेत. हजारो कोटींचा भ्रष्टाचार व शेतकरी सभासदांची होणारी लूट यावर निष्क्रियतेचा पडदा टाकून या सर्व चोऱ्या कालबाह्य होईपर्यंत दडवून टाकण्याचे जाणीवपूर्वक कृत्य होत आहे. यात शासन व शासकीय यंत्रणाही समाविष्ट झालेली दिसते याचे दुःख होते.
सन २०१२-१३ साली ९७वी घटना दुरुस्ती सहकार चळवळीवर लादण्यात आली. हीच घटना दुरुस्ती सहकार चळवळीला लागू नाही हा सुप्रीम कोर्टाने अलीकडच्या काळात निकाल दिला आहे. राज्य सरकारने ही घटना दुरुस्ती करून ज्या लोकांना अधिकारापासून बाजूला केले. त्या लोकांना त्यांचे अधिकार परत मिळवून देण्यासाठी शासनाने प्रयत्न करायला हवेत, असेही डॉ. मोहिते म्हणाले.
चौकट
यांनी तर नुरा कुस्ती केली...
कृष्णा कारखान्यातील सत्ताधाऱ्यांचा विजय म्हणजे स्टेराॅईड खाऊन पदक जिंकल्यातला प्रकार आहे. कारखान्यात सुमारे ८ हजार ९०० मयत सभासदांच्या वारसांना मतदानापासून वंचित ठेवले. नवीन सभासद करताना तोंडे बघून सभासदत्व दिले. त्यामुळे त्यांनी केलेली कुस्ती ही नुरा कुस्ती आहे, असेही डॉ. मोहिते यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
फोटो
इंद्रजित मोहिते यांचा आयकार्ड फोटो वापरावा