उंडाळे : कऱ्हाड तालुक्यातील सवादे येथील ‘बेलदरा’ नावाच्या शिवारात गुरुवारी सकाळी चार महिन्यांचा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. उष्माघाताने संबंधित बिबट्याचा मृत्यू झाल्याची शक्यता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. कोरड्या पाझर तलावापासून काही अंतरावर पंचनाम्याचे सोपस्कार उरकल्यानंतर सायंकाळी बिबट्याचा मृतदेह कऱ्हाडला शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील म्हासोली, उंडाळे, बांदेकरवाडी व सवादे परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा वावर आहे. या गावानजीक डोंगररांगा आहेत. तसेच अनेकांचे शेतशिवारेही या परिसरात आहेत. त्यामुळे शिवारात गेलेल्या ग्रामस्थांना अनेकवेळा बिबट्याचे दर्शन झाले आहे. तसेच बांदेकरवाडीत काही महिन्यांपूर्वी बिबट्याने चालत्या जीपवर झेप घेतली होती. या प्रकारांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. अशातच गुरुवारी सकाळी सवादे हद्दीत बिबट्याचा चार महिन्यांचा बछडा मृतावस्थेत आढळून आला. सवादेत डोंगररांगांनजीक पाझर तलाव असून, या तलावापासून काही अंतरावर ‘बेलदरा’ नावाचे शिवार तसेच पाण्याची टाकी आहे. काही ग्रामस्थ गुरुवारी सकाळी शिवारात गेले होते. त्यावेळी भगवान जाधव यांच्या मालकीच्या मोकळ्या शिवारात बिबट्या मृतावस्थेत पडल्याचे आढळून आले. ग्रामस्थांनी ही माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर वनपाल आर. डी. माळी, संतोष जाधवर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मुसळे यांना घटनास्थळी बोलावून घेतले. डॉ. मुसळे यांनी मृत बिबट्याची पाहणी केली. त्यानंतर बिबट्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून देण्यात आला.पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत बिबट्याची पाहणी केली. त्यावेळी त्याच्या तोंडातून फेस आला असल्याचे निदर्शनास आले. तसेच मृत्युपूर्वी त्याने उलट्या केल्याचेही दिसून येत होते. त्यामुळे उष्माघाताने त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. संबंधित बिबट्या मादी जातीचा असून, तो सुमारे चार महिन्यांचा आहे.
उष्माघाताने बिबट्याचा मृत्यू!
By admin | Published: May 06, 2016 1:26 AM