तरडगाव : फलटण तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्येचे प्रमाण कमी-जास्त होत असले तरी वाढता मृत्युदर चिंतेचा विषय ठरत आहे. बाधितांसाठी रुग्णालयात बेड मिळविणे मुश्कील आहे. उपचारादरम्यान बक्कळ पैसे मोजूनही जीवाला मुकावे लागत असल्याने सर्वसामान्यांना धडकी भरत आहे. अशातच एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूची वार्ता चटका लावून जात आहे. तर अशा प्रिय व्यक्तींना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली जात आहे.
सध्या कोरोना संसर्ग सुरू नसता तर सगळीकडे ग्रामदैवताच्या यात्रा पाहावयास मिळाल्या असत्या. पै-पाहुणे, गावकरी मनोरंजनाचा आस्वाद घेत गावच्या पारावर गप्पा मारताना दिसले असते. मात्र, याउलट कोरोनाच्या महामारीमुळे होत असलेली मनुष्यहानी पाहता सणासुदीसह सर्वच मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा विसर पडलेला दिसत आहे. सगळेच थांबलेल्या या दुनियेत जगायचे तरी कसे, असा प्रश्न साऱ्यांना पडला आहे.
गत महिनाभरापासून तालुक्यात कोरोनामुळे मृत्यू झालेली संख्या मोठी आहे. अनेक दिवस रुग्णालयात उपचार करूनही रुग्ण बरा होईल की नाही, याबाबत ठाम सांगता येत नाही. धनाढ्य व्यक्तींनादेखील मृत्यूला सामोरे जावे लागत असल्याने जिथे दोन वेळची भाकरी मिळविणे अवघड होऊन बसले आहे, अशा गोरगरीब कुटुंबातील व्यक्तींमध्ये हा मृत्यूचा वाढता दर धडकी भरवीत आहे. यामुळे ते या रोगाला बरेच घाबरून आहेत.
सुरुवातीला कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये वृद्धांचे प्रमाण जास्त होते. आता तरुणांनादेखील कोरोना कवटाळत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. ज्याच्या सोबत खेळत, बागडत, शिक्षण घेत लहानाचा मोठा झालो अशा तरुण मित्राच्या मृत्यूची वार्ता दोस्तांसाठी चटका लावून जात आहे. आजवर कोरोनाने सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रांत कार्यरत असलेल्या अनेक चांगल्या व्यक्तींचा बळी घेतल्याचे पाहावयास मिळते. अशा व्यक्तींच्या अचानक जाण्याने समाजमन दुखावले जात आहे.