सातारा : जिल्ह्यात महिन्यातून तीन ते चार सर्पदंशाच्या घटना घडत असतात. मात्र, यामध्ये मृत्यूचे प्रमाण अत्यंत कमी असून, गतवर्षी तीन तर यंदा दोघांचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. रुग्णावर तत्काळ उपचार केले जात असल्यामुळे सर्पदंश झालेल्या व्यक्तिचा जीव वाचत असल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यातील बामणोली, महाबळेश्वर, पाटण या परिसरामध्ये सर्वाधिक सर्पदंशाचे प्रकार घडत आहेत. सर्पदंश झाल्यानंतर तेथील नागरिक तत्काळ संबंधिताला रुग्णालयात दाखल करतात. सलग तीन ते चार दिवस उपचार केल्यानंतर रुग्ण बरे होत आहेत. वेळेत रुग्णालयात पोहोचले नाही तर सर्पदंश झालेला रुग्ण दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे घरगुती उपाय न करता रुग्णाला तत्काळ रुग्णालयात दाखल करणे गरजेचे असते. गत पाच वर्षांपूर्वी जिल्ह्यात सर्पदंशाने मृत्यू जास्त होत होते. त्यावेळी ही संख्या बारावर होती. मात्र, हळूहळू लोक सतर्क झाल्याने तत्काळ रुग्णालयात येऊ लागले. त्यामुळे सर्पदंशाने मृत्यू होण्याचे प्रमाण घटले. काहीजण भीतीमुळेही उपचाराला प्रतिसाद देत नाहीत.
साप चावताच काय काळजी घ्यावी
साप चावल्याचे निदर्शनास येताच सर्वांत अगोदर अजिबात घाबरून जाऊ नये. वेळ न दवडता तत्काळ दवाखान्यात जावे. साप चावलेल्या वक्तीला इतरांनी धीर द्यावा. रुग्णालयाचे अंतर खूप दूर असेल तर प्रथमोपचार करावे. ज्या ठिकाणी सर्पदंश झाला असेल त्याच्या पाठीमागे काही अंतर रूमालाने बांधावे. जेणेकरून रक्तप्रवाह कमी होऊ शकतो. तसेच शक्य झाल्यास सर्पदंशाच्या ठिकाणी ब्लेडने थोडेसे कापावे जेणेकरून विष रक्ताद्वारे बाहेर पडेल.
जिल्ह्यात आढळणारे साप
जिल्ह्यात मण्यार, फुरसे, घोणस अशाप्रकारचे विषारी साप निघण्याचे प्रमाण जास्त आहे. तर त्यासोबत बिनविषारी असलेले सापदेखील निघण्याचे प्रमाण त्याच पटीत आहे. त्यात पाणघळ, धामण आदी विविध जातींचा समावेश आहे तसेच डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात नाग आढळतात. नागरी वस्तीवर साप आढळून येण्याचे प्रमाण उन्हाळ्यामध्ये सर्वाधिक आहे.
जिल्ह्यात लसींचा साठा किती उपलब्ध?
जिल्हा शासकीय रुग्णालयात ॲन्टी स्नेक व्हेनम नावाची लस आहे. ही लस सर्पदंश झालेल्या रुग्णाला दिली जाते. सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयातही ही लस उपलब्ध असते.