कोयनानगर : पाटण तालुक्यातील लेंढोरी गावातील रोहित महिपती सुतार (वय १५) या आठवीतील विद्यार्थ्याला रात्री झोपेत असताना सर्पदंश झाला. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. रुग्णालयात जाऊनही वेळेत उपचार न मिळाल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे.
लेंढोरी येथील रोहित सुतार हा मुलगा रविवारी रात्री आपल्या कुटुंबीयांसोबत घरामध्ये झोपला असताना, मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्याच्या कानाला मण्यार जातीच्या विषारी सापाने दंश केला. रोहितला नातेवाइकांनी तत्काळ उपचारासाठी पाटणच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, अधिक उपचारार्थ त्याला कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यास सांगण्यात आले. कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयातही डॉक्टरांनी दाखल न करताच, कृष्णा हॉस्पिटलला नेण्यास सांगितले. त्यानंतर, सह्याद्री व श्री हॉस्पिटलला उपचारासाठी फिरविण्यात आले. मात्र, कऱ्हाडमधील कोणत्याही हॉस्पिटलने उपचारासाठी रोहितला दाखल करून घेतले नाही. अखेर पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास रोहितला कऱ्हाडहून साताराला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आणि काही मिनिटांच्या कालावधीत त्याचा मृत्यू झाला.
रोहितवर वेळेत उपचार झाले असते, तर तो वाचला असता, असे नातेवाइकांचे म्हणणे असून, विविध रुग्णालयांमध्ये दाखल करून न घेतल्याने महत्त्वाचा वेळ वाया जाऊन उपचाराअभावी रोहितचा मृत्यू झाल्याचे नातेवाइकांनी सांगीतले.
फोटो : ०९ रोहित सुतार
कॅप्शन : मृत रोहित सुतार.