सातारा : अनेकदा आपण पैशासाठी खंडणी मागणारे अनेकजण पाहिले असतील पण दारूसाठी कोणी खंडणी मागितलेली एेकिवात नाही. पण साताऱ्यात मात्र, दारूसाठी खंडणीची मागणी केल्याचे समोर आलय. आम्हाला पैसे नको पण तू आम्हाला दारू दिली पाहिजेस अन्यथा तुला आणि तुझ्या बार मालकाला जीवे ठार मारू, अशा प्रकारची धमकी मद्धपींनी दिली.यानंतर हाॅटेल मालकाने तक्रार दिल्यानंतर संबंधित मद्धपींवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बाबा ओव्हाळ, बंटी गायकवाड, तन्वीर शेख व अन्य अनोळखी व्यक्ती (सर्व रा. प्रतापसिंह नगर, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संतोष रामदास मिरगे (वय ३५, रा. कोडोली, सातारा) यांचे विसावा नाक्यावर हाॅटेल आस्वाद परमिट रुम व बिअर बार आहे. या बारमध्ये वरील चाैघांनी एके दिवशी येऊन दारू ढोसली. मात्र, त्याचे पैसे दिले नाहीत. मात्र, हे चाैघेजण काल, बुधवारी पुन्हा बारमध्ये आले. यावेळी पहिले बिल दिले नसल्याने मिरगे यांचा आत्तेभाऊ मदन शिंदे याने त्यांना दारू देण्यास नकार दिला.त्यामुळे या चाैघांनी चिडून त्याला धमकी दिली. तू आम्हाला दारू दिली नाहीस तर तुला व तुझा मालक संतोष मिरगे यांना ठार मारेन. तसेच तोडफोडही करेन, अशी तंबी दिली. एवढेच नव्हे तर तंबी देऊन घेतलेल्या २४५ रुपयांचे दारूचे बिल न देताच तेथून ते निघून गेले. या प्रकारानंतर बार मालक मिरगे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी संबंधितावर गुन्हा दाखल केला.
Crime News Satara: पैशासाठी नव्हं तर, दारुसाठी दिली जीवे मारण्याची धमकी; साताऱ्यात चौघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2022 3:31 PM