गणपतीची सजावट करताना शॉक लागून युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 02:09 PM2018-09-15T14:09:12+5:302018-09-15T14:17:25+5:30
गणपतीची सजावट करत असताना शॉक लागून मयूर सुरेश बैलकर (वय २२, रा. चारदरे-वाटंबे ता. जावळी) या युवकाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास घडली. ऐन गणेशोत्सवामध्ये ही दुर्दैवी घटना घडल्याने वाटंबे गावासह जावळी तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
मेढा: गणपतीची सजावट करत असताना शॉक लागून मयूर सुरेश बैलकर (वय २२, रा. चारदरे-वाटंबे ता. जावळी) या युवकाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास घडली. ऐन गणेशोत्सवामध्ये ही दुर्दैवी घटना घडल्याने वाटंबे गावासह जावळी तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मयूर हा वडिलांसमवेत मुंबई येथे वास्तव्य करत होता. तर त्याची आई आणि बहीण हे गावी असतात. गणेशोत्सवासाठी मयूर आणि वडील सुरेश बैलकर हे दोन दिवसांपूर्वी गावी आले. गणपतीची प्रतिष्ठापना त्यांनी केली.
शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास गणेशमूर्तीसमोर मयूर हा सजावट करत होता. त्यासाठी तो हॅलोजन लावत होता. त्यावेळी त्याने नकळत टोक काढण्यासाठी वायर तोंडात धरली. याचवेळी त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. काही कळायच्या आतच तो बेशुद्ध पडला.
घरातील लोकांना हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांनी विजेचे बटण बंद केले. त्यानंतर मयूरला केळघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
मयूर हा एकुलता एक होता. त्याला दोन बहीणी आहेत. त्याचे बीकॉमपर्यंत शिक्षण झाले होते. तो मुंबई येथे चांगल्या नोकरीच्या शोधात होता. एकुलत्या एक मुलाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.