सातारा: गाडीचे कर्जाचे हप्ते भरण्याचा करार करून ३ लाख २६ हजार ९३४ रुपयांचे कर्जाचे हप्ते थकवून एका व्यावसायिकाची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे. उन्मेश उल्हास शिर्के (रा. नीरा, ता. पुरंदर, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राजेश गवळी (वय ४०, रा. चिमणपुरा पेठ, सातारा) यांचा वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडून उन्मेश शिर्के याने छोटा हत्ती टेम्पो गाडीचे हप्ते भरण्याचा करार करून आपल्या ताब्यात घेतला. मात्र, ठरलेल्या कराराप्रमाणे हप्ते भरण्यास बांधिल असताना शिर्के याने फसवणूक करण्याच्या उद्देशाने ३ लाख २६ हजार ९३४ रुपयांचे कर्ज थकविले. इतकेच नव्हे तर परस्पर टेम्पो विकून त्याने अपहार करून गवळी यांची फसवणूक केली. त्यामुळे उन्मेश शिर्केवर सातारा शहर पोलीस ठाण्यात अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
कर्ज थकवून व्यावसायिकाची तीन लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 3:19 PM