पाटण : ‘राज्यातील शेतकरी कर्जमाफीनाही तर कर्जमुक्त झाला पाहिजे, हे सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाजूचे आहे. योग्यवेळी हे सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहे. विधिमंडळाचे सदस्य म्हणून तर विधानसभा सभागृहात आम्ही मुख्यमंत्री यांना शेतकऱ्यांना केवळ कर्जमाफी नाही तर कर्जमुक्तीच द्या, यासाठी आग्रही राहणार आहे,’ अशी परखड भूमिका शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई व्यक्त केली.राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, सर्वपक्षीय आमदारांची चर्चा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवसेनेच्या वतीने आमदार शंभूराज देसाई बोलत होते.आमदार देसाई म्हणाले, ‘शेतकरी कशावर अवलंबून आहे, हे पाहणे महत्त्वाचे आहे. याच शेतकऱ्यांच्या शेतीला शाश्वत पाणी मिळाले पाहिजे, या शेतकऱ्यांना शाश्वत पाणी देण्यासाठी पूर्वीच्या पंधरा वर्षांच्या काळात शेतकऱ्यांच्या बांधावर शाश्वत पाणी आलं का? हे ही पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे. या गोष्टी मागील सरकारने केल्या नाहीत आणि दुसऱ्या बाजूला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना त्यांनी स्वत: सांगितले होते की, ‘सत्तर हजार कोटींची जलसंपदा विभागाची गुंतवणूक होऊन १ टक्का क्षेत्रही ओलिताखाली आले नाही. सत्तर हजार कोटींची गुंतवणूक करूनदेखील या जुन्या सरकारने त्या शेतकऱ्यांच्या शिवारामध्ये त्याच्या बांधापर्यंत जर पाणी नेलं नाही तर हे जुन्या सरकारचे नाही तर राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे दुर्दैव म्हणावे लागेल. शेतकरी आत्महत्या करतो म्हणजे त्याने शेतामध्ये घेतलेली मेहनत व शेतीत केललं कष्ट याचा त्याला मोबदला, त्याच उत्पन्न मिळत नाही म्हणून त्यानं आत्महत्येचे धोरण स्वीकारले. शेतकरी कर्जमाफीबरोबर कर्जमुक्त झाला पाहिजे, हीच आमची भूमिका सुरुवातीपासून होती, आम्ही या भूमिकेशी आजही ठाम आहोत. आज एका रात्रीत कर्जमाफी करणे शक्य होणार नाही.’ (प्रतिनिधी)
कर्जमाफी नाही तर कर्जमुक्त झाला पाहिजे
By admin | Published: March 09, 2017 11:12 PM