सातारा : अनेक वर्षांपासून रखडलेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा तिढा सोडविण्यात अखेर यश आले आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकल्पासाठी कृष्णा खोरे महामंडळाच्या मालकीची २५ एकर जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला.
आघाडी शासनाच्या काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व १०० खाटांच्या हॉस्पिटलला मंजुरी मिळाली होती. सातारा तालुक्यातील खावली या गावची शासकीय जमीन या प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आली होती. ही जागा सातारा शहरापासून लांबच्या अंतरावर असल्याने ते गैरसोयीचे होईल, असे लक्षात घेऊन ही जागा बदलण्यात आली.
शहरालगत कृष्णा खोरे महामंडळाच्या मालकीच्या जागेत हे महाविद्यालय उभारण्याची चर्चा झाली होती, परंतु ही जागा एका खात्याकडून दुसºया खात्याकडे वर्ग करताना तिढा निर्माण झाल्याने आजतागायत हा प्रश्न भिजत पडला होता. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मार्गी लागावे, यासाठी वारंवार पाठपुरावा सुरू होता. सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकाºयांकडून याबाबत वारंवार शासनाचे मंत्री, अधिकारी यांना विचारणा केली जात होती.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत वाढलेल्या जनरेट्यामुळे शासनाला अखेर जागा देण्याबाबतचा निर्णय घ्यावा लागला. सातारा येथील महाराष्ट्र कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाची २५ एकर जागा उपलब्ध करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याने सातारकरांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी मिळणार आहे. या ठिकाणी १०० खाटांचे मोठे हॉस्पिटलही सुरू होणार असल्याने गरजू रुग्ण उपचारांपासून वंचित राहणार नाहीत.
साताºयाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला २०१५-१६ मध्ये इंडियन मेडिकल कौन्सिलची मान्यता मिळाली होती. मधल्या काळात ही मान्यता रद्द झाली. आता २०१८-१९ साठी नव्याने मान्यता मिळविण्याची गरज आहे. यासाठी राज्य शासनाचा वैद्यकीय शिक्षण विभाग व स्वत: मुख्यमंत्री याचा पाठपुरावा करत आहेत. कृष्णा खोरे महामंडळाची जागा देण्याचा निर्णय झाला असल्याने आता संबंधित जागा वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकांच्या नावे होईल. मात्र, यासाठी स्थानिक पातळीवरून स्वतंत्र अथवा नव्याने प्रस्ताव सादर करण्याची गरज राहिलेली नाही.- डॉ. श्रीकांत भोई, जिल्हा शल्यचिकित्सक