म्हसवड : सामाजिक वनीकरण विभाग, सातारा यांच्या वतीने म्हसवड - शिंगणापूर येथील यात्रा पटांगणावरील उजाड माळरानावर हजारो वृक्ष लावून शिंगणापूर हिरवेगार करण्याच्या स्तुत्य उपक्रमास नुकतीच सुरुवात केली आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या स्तुत्य उपक्रमामुळे दुष्काळी जनतेतून आनंद व्यक्त केला जात आहे.
सामाजिक वनीकरण विभाग, सातारा यांच्या वतीने शिंगणापूर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राशेजारील गावठाणात ३३ हजार ३३३ झाडे लावण्याचा प्रारंभ माजी सरपंच राजाराम बोराटे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच रेश्मा शिंगाडे, उपसरपंच शशिकांत भोसले, अनघा बडवे, वर्षा दणाने, मंजुषा तोडकर, राजू पिसे, डॉ. अतुल बंदुके, शीतल बडवे, हरिभाऊ बडवे, दादा शिंगाडे, प्रमोद बडवे, अशोक भोसले, दीपक बडवे, अनिल बडवे, दौलत शिंगाडे, मनोज खंदारे, बाळू होळ उपस्थित होते.
शिखर शिंगणापूर हे शंभु महादेवाचे तीर्थक्षेत्राचे ठिकाण असून, या देवाची वार्षिक चैत्र यात्रा उन्हाळ्यात असते. लाखो भाविक भक्त येतात. त्याना निवारा मिळावा, तसेच पर्यटनाला चालना मिळावी, या उद्देशाने शिंगणापूर येथील तीस हेक्टर क्षेत्रावर ३३ हजार ३३३ वृक्षांची लागवड करण्यास प्रारंभ झाला. या क्षेत्रावर बेल गुलमोहर, चिंच, जांभुळ, कडुलिंब, शिराम, कांचन, करंज, गुळभेंडी, रेट्री अशा विविध झाडांची लागवड केली जाणार आहे
शिखर शिंगणापूर येथे लावण्यात येणाऱ्या झाडांची निगा व संरक्षण सामाजिक वनीकरण विभाग यांच्याकडून केले जाणार आहे. शिंगणापूर गावामध्ये लावण्यात येणाऱ्या झाडांच्या संदर्भात शिंगणापूर ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सामाजिक वनीकरण विभागाला सर्व सहकार्य करण्यात येईल, असे माजी सरपंच राजाराम बोराटे यांनी यावेळी सांगितले.