लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोविडमुुक्त परिसरात आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग १६ ऑगस्टपासून सुरू होणार आहेत. यासाठी ग्रामस्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. शाळा सुरू करण्यासाठी संबंधित गावांत मागील महिन्यात एकही कोविड रुग्ण आढळला नसल्याची अटही घालण्यात आली आहे.
कोरोनाच्या काळात मागील दीड वर्षांपासून अधिक काळ शाळा, महाविद्यालये बंद आहेत. मात्र, गेल्या महिन्याभरापासून राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने लॉकडाऊन शिथिल करण्यात आले. त्यानंतर शाळाही सुरू करण्याची मागणी जोर धरू लागल्याने अखेर शिक्षण विभागाने काही अटींची बंधने घालून शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
यासाठी ग्रामस्तरावर नियोजन करण्यात आले असून शिक्षकांच्या कोविड चाचण्या बंधनकारक करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागात सरपंचांच्या अध्यक्षतेखाली तलाठी, शाळी व्यवस्थापन समिती अध्यक्ष, वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक, मुख्याध्यापक व केंद्र प्रमुखांची समिती नेमण्यात येणार आहे. याचबरोबर केवळ कोविडमुक्त परिसरातच शाळा सुरू करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.
गावातील शाळा सुरू करताना सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश देताना थर्मलगन, ऑक्सिमीटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची तपासणी करून शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. याबरोबरच शाळेत कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास तत्काळ शाळा बंद करून पुढील उपाययोजना कराव्यात, शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने बोलवावे, तसेच एका बाकड्यावर एकच विद्यार्थी बसवावा, असे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत.
दरम्यान, जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये कोरोनाच्या बाधित व संशयित रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत. मात्र, शाळा सुरू करण्याचे आदेश आल्याने संबंधित शाळेतील विलगीकरण केंद्र इतर ठिक़ाणी हस्तांतरित करण्याचे आदेश ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत. संपूर्ण शाळांचे निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
चौकट :
ग्रामपंचायत स्तरावरील समितीत यांचा सहभाग
ग्रामीण भागात कोविडमुक्त गावातील ग्रामपंचायतीने त्यांच्या अखत्यारित असणारे गावातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी पालकांशी चर्चा करून ठराव करणं अपेक्षित आहे. ग्रामपंचायत स्तरावर सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली तलाठी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य म्हणून असणार आहेत. वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र निमंत्रित सदस्य असणार आहेत. ग्रामसेवक सदस्य सचिव, तर मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख हे सदस्य असणार आहेत.विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळा परिसरात गर्दी न करण्याचं आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.
कोट :
शाळा सुरू करण्यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज आहे. ग्रामस्तरावर समितीने निर्णय घेऊन शाळा प्रशासन आणि शिक्षण विभागाला याची माहिती द्यावी. शाळा सुरू करताना संपूर्णपणे काळजी घेतली जाणार आहे. त्यामुळे शाळा भरण्यासाठी काहीही अडचण नाही, असे दिसते.
- प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी.