सातारा : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या परिस्थितीत स्वस्त धान्य विक्रेत्यांना ग्राहकांचे अंगठे घेणे सक्तीचे केले आहे. ग्राहकांशी निकट संपर्क येत असल्याने कोरोनाचा धोका वाढत आहे. त्यामुळे ग्राहकांऐवजी दुकानदारांचे अंगठे घेण्यास परवानगी मागितली होती. ती मान्य होईपर्यंत स्वस्त धान्य विक्री थांबविण्यात येणार आहे,’ अशी माहिती रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी दिली.
जिल्हा पुरवठा अधिकारी रजेवर असल्याने त्यांचा पदभार असलेल्या रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी यांची श्रीकांत शेटे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी कोरोना काळात दुकानदारांच्या अंगठ्याने धान्य वाटप करण्यास परवानगी मिळावी, दुकानदारांच्या गतवर्षी मोफत वाटप केलेल्या धान्याच्या कमिशनबाबत, तसेच इतर अडचणींबाबत चर्चा करण्यात आली. त्यावेळी कुलकर्णी दोन दिवसांपूर्वीच मंत्रिमंडळ बैठकीत दुकानदाराच्या अंगठ्याने धान्य वाटपास शासनाने तत्त्वतः मान्यता दिल्याचे सांगितले. याबाबत एक-दोन दिवसांत शासनाकडून लेखी येईल, सांगितले. दरम्यान, आदेश येईपर्यंत धान्य वितरण थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.