सातारा : जिल्ह्यातील ६५२ ग्रामपंचायतींसाठी ईर्षा, चुरस आणि राजकीय द्वंद्वातून मतदान झाल्यानंतर, आता मतमोजणीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सोमवारी सकाळपासूनच या मोजणीला सुरुवात होणार असून दुपारपर्यंत संपूर्ण निकाल लागेल. त्यामुळे या मतमोजणीनंतरच नवे गावकारभारी कोण, हे स्पष्ट होईल.
जिल्ह्यात १ हजार ४९० हून अधिक ग्रामपंचायती आहेत. यामधील अर्ध्याहून अधिक म्हणजे ८७८ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक जाहीर झालेली. मात्र, उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील २०० हून अधिक ग्रामपंचायतींची पूर्णत: व अंशत: निवडणूक बिनविरोध झालेली. जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने ग्रामपंचायती बिनविरोध झालेल्या, तर उर्वरित ग्रामपंचायतींसाठी शुक्रवार, दि. १५ रोजी मतदान झाले होते.
जिल्ह्यातील ६५२ ग्रामपंचायतींसाठी कमी-अधिक फरकाने चुरशीने मतदान झाले. काही ठिकाणी वादाचे प्रसंग वगळता मतदान शांततेत पार पडले. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी सुमारे ७६ टक्केंवर मतदान झाले. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत हे मतदान झाले. जिल्ह्यातील २ हजार ३८ केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. अनेक गावांतील मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या, तर राजकीय नेत्यांनी वाडी-वस्तीवरील लोकांना मतदानाला आणण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली होती. ९ लाख ८४ हजार ८३२ मतदारांपैकी जवळपास ७ लाख ४८ हजार ४९५ जणांनी आपला हक्क बजावला.
सातारा तालुक्यात सुमारे ८० टक्के मतदान झाले. तालुक्यातील ९० ग्रामपंचायतींसाठी चुरशीने मतदान झाले. कोडोली, अंगापूर, अतित, तासगाव, नांदगाव, शिवथर, गोवे आदी गावांत चुरस पाहायला मिळाली.
वाई तालुक्यात शांततेत ८५ टक्के मतदान झाले. संवेदनशील गावांत अधिक मतदान झाले आहे. पाटण तालुक्यात सरासरी ७५ ,तर कऱ्हाडला ८० टक्के मतदान झाले. पाटण तालुक्यात खऱ्याअर्थाने दोन गटातच निवडणूक असल्याने ईर्षा आणि चुरसच पाहायाला मिळाली. फलटण तालुक्यात सरासरी ८२, खटावमध्ये ७८.६०, कोरेगावला ८२, जावळीत ७६, महाबळेश्वर तालुक्यात ७७ टक्के मतदान झाले आहे.
मतदानानंतर गावचे कारभारी कोण, हे सोमवारी स्पष्ट होईल. सकाळपासून ही मतमोजणी सुरू होणार आहे. दुपारपर्यंत ग्रामपंचायतीत कोणत्या गटाला व पक्षाला किती जागा मिळाल्या, हे स्पष्ट होईल.
चौकट :
तालुकानिहाय मतमोजणी येथे होणार...
सातारा तालुका : छत्रपती शाहू स्टेडियम, सातारा
कऱ्हाड : रत्नागिरी शासकीय धान्य गोदाम भेदा चौक, कऱ्हाड
पाटण : बाळासाहेब देसाई कॉलेज क्रीडा संकुल, पाटण
जावळी : तहसील कार्यालय, मेढा
महाबळेश्वर : तहसील कार्यालय
वाई : तहसील कार्यालय नवीन इमारत
खंडाळा : पंचायत समितीचे किसन वीर सभागृह
फलटण : शासकीय धान्य गोदाम, फलटण
माण : नवीन शासकीय धान्य गोदाम, दहीवडी
खटाव : नवीन प्रशासकीय इमारत, वडूज
कोरेगाव : इंडोअर स्पोर्टस् हॉल, डी. पी. भोसले महाविद्यालय, कोरेगाव
....................................................................