पंतप्रधानांकडून महाराष्ट्रावर अन्याय करणारे निर्णय, पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 02:13 PM2022-10-24T14:13:26+5:302022-10-24T14:14:51+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगासह इतर संस्थांही काबीज केल्या

Decisions by Prime Minister doing injustice to Maharashtra, Criticism of Congress leader, former Chief Minister Prithviraj Chavan | पंतप्रधानांकडून महाराष्ट्रावर अन्याय करणारे निर्णय, पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात

पंतप्रधानांकडून महाराष्ट्रावर अन्याय करणारे निर्णय, पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात

Next

सातारा : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगासह इतर संस्थांही काबीज केल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून महाराष्ट्रावर अन्याय करणारे निर्णय होत आहेत,’ असा घणाघात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला, तसेच यावेळी त्यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही केली. सातारा येथील काँग्रेस कमिटीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, राजेंद्र शेलार, नरेश देसाई, उदयसिंह पाटील आदी उपस्थित होते.

माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक २२ वर्षांनी झाली. ही निवडणूक पक्षाच्या घटनेनुसार झाली. आता मल्लिकार्जुन खरगे हे अध्यक्ष झाले असून, त्यांच्या माध्यमातून पक्षाला चांगले दिवस येतील. राहुल गांधी यांचीही ‘भारत जोडो’ पदयात्रा सुरू आहे. ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात ही यात्रा येत आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करून लोकशाही टिकविण्याचे काम राहुल गांधी यांची ही ‘भारत जोडो’ यात्रा करेल. त्याचबरोबर काँग्रेसमधून जे बाहेर गेलेत, त्यांना परत कसे आणता येईल, हेही पाहिले जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना चव्हाण म्हणाले, केंद्रीय निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे का नाही, असा प्रश्न आहे. कारण, पंतप्रधानांनाच अशा संस्थांच्या नेमणुकीचे अधिकार आहेत. राज्यातील सरकार तर तात्पुरती व्यवस्था आहे. ईडीच्या तावडीतून सुटण्यासाठी हे डबल इंजिनचे सरकार आहे. याचा फटका राज्याला बसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार घालविण्यासाठी काँग्रेसलाच पुढाकार घ्यावा लागेल.’

काँग्रेसवर आपण नाराज होता, त्याचे काय झाले? असा प्रश्न पत्रकारांनी केल्यावर माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, त्यावेळी आम्ही काँग्रेस अध्यक्षांना पत्र दिले होते. हे पत्र गोपनीय होते. तरीही त्याची माहिती बाहेर गेली. त्यावेळी सोनिया गांधींनी सर्व बाबी मान्य केल्या. आता नाराज असण्याचे कारणच नाही.

शाळा बंदचा निषेध ठराव...

जिल्हा काँग्रेस कमिटीत पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत विविध ठराव घेण्यात आले. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून त्वरित मदत देण्यात यावी, याचा ठराव झाला. त्याचबरोबर राज्यात कमी पटांच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील १,०७७ शळा बंद होतील. त्यामुळे ११ हजार मुलांचे शिक्षण थांबणार आहे. याबाबतच निषेध ठराव घेण्यात आला.

Web Title: Decisions by Prime Minister doing injustice to Maharashtra, Criticism of Congress leader, former Chief Minister Prithviraj Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.