सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात दोन दिवस धुमाकूळ घालणाऱ्या पावसाचा जोर शुक्रवारपासून कमी झाला आहे. साताऱ्यातही अधून मधून सरी पडत होत्या. असे असले तरी कोयना धरण पाणीसाठ्यात २४ ताससांत जवळपास साडे तीन टीएमसीने वाढ झाली. त्याचबरोबर जिल्ह्यातील प्रमुख धरणांतही पाणीसाठा वाढू लागला आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात तीन दिवसांपासून मान्सूनचा पाऊस होत आहे. मंगळवार सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस शुक्रवारीही सुरूच होता. पण, गुरूवारच्या तुलनेत शुक्रवारी पावसाचा जोर कमी झाला. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १४२ मिलीमीटर पाऊस झाला. तर यावर्षी जून पासून ५८५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
नवजाला १२२ तर आतापर्यंत ६३४ मिलीमीटर पाऊस झाला. महाबळेश्वरला शुक्रवारी सकाळपर्यंत १२६ मिलीमीटर पाऊस पडला. तर यावर्षी आतापर्यंत ७०८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात जूनपासून आतापर्यंत सर्वाधिक पाऊस हा महाबळेश्वर येथेच नोंद झाला आहे.कोयना धरणात २४ तासांत जवळपस साडे तीन टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. शुक्रवारी सकाळी ३५.१३ टीएमसी ऐवढा साठा होता. तर ४९६०४ क्यूसेक वेगाने पाणी धरणात येत होते. उरमोडी धरणात ६.३७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तर शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत धरण परिसरात १४४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. धरणात ५९९५ क्यूसेक वेगाने पाणी येत होते.जिल्ह्याच्या पश्चिम भागातील कास, तापोळा, बामणोली या भागातही गुरूवारच्या तुलनेत पाऊस कमी झाला आहे. तर साताऱ्यात शुक्रवारी सकाळपासून पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यातच अधून-मधून सूर्यदर्शन होत होते. जावळी, वाई, पाटण, कऱ्हाड या तालुक्यातील काही भागातही पावसाने चांगली हजेरी लावली.